
27 तासांच्या मेगाब्लॉकमध्ये 17 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर धोकादायक ठरलेला ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचा सांगाडा हटवण्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे या मुख्य मार्गावरील लोकल सुरू झाली. त्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूकही सुरू झाली आहे. दरम्यान, मेल-एक्स्प्रेस यार्डलाइनची वाहतूक 27 तासांनंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजता सुरू होणार आहे.
ब्लॉक कालावधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ठाणे लोकल दुपारी 3.50 मिनिटांनी सोडण्यात आलेली आहे. ही लोकल कर्नाक पुलाजवळ 4 वाजता पोहोचली. ब्लॉकच्या पहिल्या आठ तासांनंतर पुलाच्या सांगाडय़ाचा मधला भाग पूर्णपणे हटवण्यात आला. दुपारी 4 वाजता मुख्य लाईन सुरू करण्यात आली तर हार्बर लाईनही त्यानंतर दोन तासांनी सुरू करण्यात मध्य रेल्वेला यश आले.
कर्नाक पुलाच्या स्टीलच्या सांगाडय़ाची लांबी 50 मीटर आणि रुंदी 18.8 मीटर आहे. सांगाडय़ात एकूण 7 स्पॅन होते. या स्पॅनचे 44 तुकडे करण्यात आले. एकावेळी एकच तुकडा उचलण्यात आला . 18 तुकडय़ांचे प्रत्येकी वजन 16 टन, 14 तुकडय़ांचे प्रत्येकी वजन 3 टन होते. 12 तुकडय़ांचे प्रत्येकी वजन 10 टन होते. 350 टन वजनी क्षमतेच्या 3 व्रेन तर 500 टन वजन क्षमतेची एक व्रेन होती.

































































