विनाकारण फिरणाऱ्या नऊ हजार जणांविरुद्ध नगर जिल्ह्यात गुन्हे दाखल

300

विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर नगर जिल्ह्यात पोलीस गुन्हे नोंदवत आहेत. अशाप्रकारे दीड महिन्यांत नगर जिल्ह्यात तब्बल साडेनऊ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नगर शहरातील कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्यात तब्बल सव्वा सात हजार नागरिकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुन्हे नोंदविण्यात आले असले तरी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

करोनाची साथ संपल्यानंतर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या उपयोजना केल्या आहेत. विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करणे, मास्क न घातल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा दारुविक्री, दुकाने वेळेत न बंद करणे, हाणामारी करणार्‍यांविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरुवातीला महिनाभरात आठ हजारांहून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यात गेल्या दहा दिवसांपासून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

गेल्या दीड महिन्यांत जिल्ह्यातील 30 पोलीस ठाण्यात नऊ हजार 400 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यातील सव्वा सात हजार गुन्हे नगर शहरातील आहेत. शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात सर्वाधिक तीन हजार 800, कोतवाली पोलीस ठाण्यात तीन हजार 400 तर भिंगार कॅम्पला साडेतीनशे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या