
भाईंदर पश्चिमेला असलेल्या राई गावातील नैसर्गिक तलावात बेकायदेशीररीत्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पोलीस ठाण्यात जवळपास ३१ गणेशभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शहरातील नैसर्गिक तलावात प्लास्टर ऑफ पॅरिस आणि केमिकलमुळे विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती वर्षानुवर्ष विरघळत नाहीत. त्यामुळे तलावात असलेले मासे, कासव व जलचर प्राण्यांना त्रास होऊन ते मृत्युमुखी पडत आहेत. यातून जलप्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने उच्च न्यायालयाने नैसर्गिक तलावाऐवजी कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.
टाळे तोडले
मीरा – भाईंदर शहरात ३५ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले असताना राई गावात दीड दिवसाच्या गणपतीचे काही स्थानिकांनी जबरदस्तीने नैसर्गिक तलावाचे टाळे तोडले तसेच महापालिका व पोलीस बंदोबस्ताला जुगारून धक्काबुक्की करत त्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन केले. दरम्यान बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणार नाही नैसर्गिक तलावातच करणार, असा पवित्रा घेतल्यानंतर भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उरणमधील भक्तांना वाहतूककोंडीचा फटका
ऐन गणेशोत्सवात उरणमधील दिघोडे ते गव्हाण फाटा तसेच खोपटा, कोप्रोली, उरण मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीचा फटका गणेशभक्तांना बसत आहे. त्यातच आजारी रुग्णांनाही या मार्गावरून उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना वाहतूककोंडीमुळे रस्त्यात तासन्तास अडकून पडावे लागत आहे. या वाहतूककोंडीमुळे रस्त्यात रुग्ण दगावण्याची भीती आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उरण परिसरातील ग्रामीण भागात येणाऱ्या दिघोडे, वेश्वी, जांभूळपाडा, गव्हाणफाटा, जासई, नवघर, खोपटा, कोप्रोली यादरम्यानच्या मार्गावरील रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड कंटेनर वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबकबिल्यासह बाहेर पडणाऱ्यांना या कोंडीचा सामना करावा लागत आहे.