14 वर्षांपूर्वीच्या वादात समझोता, प्रियंका चोप्राने सेक्रेटरीविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या तत्कालीन सेव्रेटरीविरुद्ध 14 वर्षांपूर्वी दाखल केलेला खटला उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. या खटल्यात तक्रारदार प्रियंका चोप्रा आणि सेव्रेटरी प्रकाश जाजू या दोघांमध्ये समझोता झाला. गुरुवारी झालेल्या सुनावणीला प्रियंकाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली आणि एफआयआर रद्द झाल्यास आपली हरकत नसल्याचे सांगितले. त्याची दखल घेत न्यायालयाने निकाल दिला.

जाजू यांनी 2001 ते 2004 पर्यंत चोप्राचे सेव्रेटरी म्हणून काम केले होते. त्यानंतर आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाला होता. तथापि, 2007 मध्ये समझोता कराराद्वारे वादावर तोडगा काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर वर्षभराने जाजू यांनी आपल्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवले, असा आरोप करीत प्रियंकाने 2008 मध्ये एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर आता 14 वर्षांनी या प्रकरणात समझोता झाल्याचे सांगत जाजू यांनी नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी प्रियंकाने प्रतिज्ञापत्र दाखल केले. जाजू यांनी हात जोडून आपली बिनशर्त माफी मागितली असून मला दुखावण्याचा वा धमकावण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे जाजू यांनी सांगितल्याचे प्रियंकाने उच्च न्यायालयाला कळवले. तिच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती प्रकाश जाधव यांच्या खंडपीठाने 14 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला.