उजळंब येथील शाखा डाकपालाने केला सुकन्या खात्यातील निधीचा अपहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

चाकूर तालूक्यातील मौजे उजळंब येथील शाखा डाकपाल संतोष ज्ञानोबा यंचेवाड यांनी डाक विभागाची व नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सुकन्या व आरपीएलआय खात्यातील 30, 569 रुपये अपहार केल्याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूर पोलीस ठाण्यात या अपहारप्रकरणी सुनील पंढरी कोलपाक डाक निरीक्षक लातूर यांनी तक्रार दाखल केली. संतोष ज्ञानोबा यंचेवाड शाखा डाकपाल उजळंब शाखा यांनी सरकारी रक्कमेचा स्वतःच्या खाजगी कामासाठी वापर केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 18 ऑगस्ट 2014 ते १९ जुलै 2018 या कालावधीपर्यंत संतोष यंचेवाड उजळंब येथे कार्यरत होते. त्यांच्याविरुध्द नळेगाव येथील उप डाकपाल यांनी तक्रार केली होती. त्यानुसार उजळंब येथील शाखा डाकघराची तपासणी सुरू करण्यात आली. सुकन्या व आरपीएलआय या खात्यामध्ये खातेदारांकडून त्यांनी पैसे जमा करून घेतले होते. मात्र, त्याचा भरणा न करता ती रक्कम स्वतःसाठी वापरली होती. त्यामध्ये कु. स्वप्नाली पिता नामदेव बब्रुवान जाधव यांची 12 हजार रुपये, कु. प्रतिक्षा सविता मुकुंद जाधव यांची 12 हजार रुपये, आरपीएल पॉलीसी जीवलगे फुलाबाई नवनाथ 6569 यांचा समावेश होता. या रक्कमेचा अपहार केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच 19 जुलै रोजी ४० हजार रुपयांचा भरणा उपडाकपाल नळेगाव यांच्याकडे केला. या प्रकरणी चाकूर पोलीसांनी संतोष यंचेवाड याच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.