
2005 मध्ये शिवसेनेशी गद्दारी केलेल्या नारायण राणे यांची सभा उधळून लावल्याच्या खटल्यात शुक्रवारी 36 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता झाली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सबळ पुराव्यांअभावी सर्व शिवसैनिकांना दोषमुक्त केले.
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर नारायण राणेंनी दादर पोलीस ठाण्याच्या पुढे जाखादेवी, प्रभादेवी येथे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सभा लावली होती. ती सभा शिवसैनिकांनी उधळली होती. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो खटला 20 वर्षांनंतर विशेष न्यायालयाने शुक्रवारी निकाली काढला आणि सर्व 36 शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रमेश सिरोया यांनी, तर शिवसैनिकांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. अनिल पार्टे, ऍड. मेराज शेख, ऍड. प्राची अनिल पार्टे, ऍड. राहुल रोकडे यांनी बाजू मांडली. ऍड. अनिल पार्टे यांनी शिवसैनिकांतर्फे युक्तिवाद केला. यामध्ये आमदार दगडू सकपाळ, महेश सावंत, अनंत (बाळा) नर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, सुहास पाटील, हरीश वरळीकर, विनायक देवरुखकर, सूर्यकांत बिर्जे, मनोहर सावंत, प्रवीण शेटये, ज्योती भोसले, स्वाती शिंदे आदी शिवसैनिक निर्दोष ठरले.



























































