वाळू तस्तकरीवरुन तरुणावर तलवारीने हल्ला; 5 जणांवर गुन्हा दाखल

400

बंदुकीचा धाक दाखवत तलवारीने वार करून तरुणाला जखमी केल्याची घटना श्रीरामपूर हरेगाव रस्त्यावरील कालव्याच्या चौफुलीवर बुधवारी (ता.२०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सचिन कृष्णा वायकर (वय 30, रा. कांदामार्केट, श्रीरामपूर) हा जखमी झाला. लोणी येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी (ता. २५) वायकर याने दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. वाळू तस्करीच्या कारणावरून ही घटना झाल्याचे सांगण्यात आले.

बिल्डर उर्फ अकील शरीफ कुरेशी, असीफ कैची, गुलाब शहा, सलीम जहागिरदार, आशु पठाण (सर्व रा. प्रभाग दोन, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. अकील कुरेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर फिर्यादी वायकर याला जखमी अवस्थेत लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री चौफुलीवर आरोपींनी आपल्या दुचाकीला कार आडवी घालण्याचा प्रयत्न केल्याने दुचाकी खाली पडली. त्यावेळी सलीम जहागिरदार याने बंदुक उगारून शिवीगाळ करत पकडले. तसेच असीफ कैची, अकील कुरेशी, आशु पठाण यांनी आपल्या खिशातील 50 हजार रुपये काढून घेतले. यावेळी आपण आपण तुम्हाला ओळखले असल्याचे सांगितल्याने जहागिरदार याने याला मारुन टाका असे म्हणत मारहाण केली. गुलाब शहा याने मानेवर तसेच पायावर तलवारीने वार केले. मानेवरील वार अडविल्याने हाताला गंभीर जखम झाली. या घटनेत हाताचे हाड मोडले. आशु पठाण व गुलाब शहा यांनी गजाने मारहाण केली, असे वायकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. जबाबावरून पोलिसांनी आरोपींविरोधात आर्म अॅक्ट तसेच लुटमार तसेच मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या