आलिशान गाडीत शिक्षकांचे मद्यप्राशन; तीन शिक्षकांसह 6 जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. या काळात मद्याची वाहतूक आणि मद्यविक्रीला बंदी करण्यात आली आहे. तसेच बियरबार आणि वाईन शॉपही बंद आहेत. मात्र, बीडमध्ये एका अलीशान गाडीत बसून मद्यपान करणाऱ्या तीन शिक्षकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकांचे मन घरात रमत नसल्याचे पोलिसांनी बीडमध्ये केलेल्या कारवाईवरून दिसत आहे. याआधी कधी जुगार अड्डा, कधी दारूच्या गुत्त्यावर शिक्षक आढळले आहेत. अशीच घटना बुधवारी बीडमध्ये घडली आहे. बीड तालुक्यातील म्हसोबा फाटा परिसरात एका आलिशान गाडीमध्ये दारु पिताना तीन शिक्षकांसह सहा जणांना पकडून त्यांच्यावर बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील म्हसोबा फाटा परिसरात एका इनोव्हा गाडीमध्ये दारू पित बसले होते. बीड ग्रामीण पोलीस गस्तीवर असताना सहज त्यांची चौकशी केली. यावेळी यांच्याकडे कुठलाही पास नव्हता. फक्त दारू पिण्यासाठी ते घराबाहेर पडल्याचे चौकशीतून उघड झाले. त्यांच्याकडील मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम 188, 269, 270 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब), महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम, महाराष्ट्र कोव्हीड अधिसूचना नियम 2020 (11ऑ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल सानप,पोलीस नाईक तानाजी डोईफोडे यांनी केली.