
विमान प्रवासासाठी एकाच कुटुंबातील तिघा जणांनी कोरोना चाचणीच्या अहवालात फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या तिघा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले असताना त्यात फेरफार करून तो निगेटिव्ह करून घेत मुंबईहून जयपूर प्रवासासाठी इतरांचे जीव धोक्यात घालण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या तिघांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार येथील थवानी कुटुंबातील तिघांनी फेब्रुवारी महिन्यात आरटीपीसीआर चाचणी केली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले होते. कोरोनाची लागण झाल्याने पालिका एच पश्चिम वॉर्डाचे डॉक्टर ओम प्रकाश जैस्वाल यांना थवानी यांनी त्याचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. त्यानंतर जैस्वाल यांनी थवानी यांना व्हॉट्सऍपवर अहवाल पाठवण्यास सांगितले. थवानी यांनी तो खासगी लॅबचा अहवाल डॉ. जैस्वाल यांना पाठवला. तो अहवाल बनावट होता.
























































