
तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासह 19 जणांविरुध्द मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव गावात जाऊन आमदारांसह त्यांच्या समर्थकांनी हिंमतराव पाटील यांच्या घरात घुसून गोंधळ केला. त्यांना मारहाण करत बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपी फरार आहेत. मात्र, आमदार राणा पाटील यांची फोर्ड इंडेव्हर गाडी घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहे.
कळंब पंचायत समितीच्या सभापती पदासाठी 31 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ही पंचायत समिती सध्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या गटाकडे आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या गटाकडे 10 व शिवसेनेकडे 6 सदस्य आहेत. मात्र, आमदार पाटील गटामधील काही सदस्य गायब झाले आहेत. त्यामुळे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह इतर 18 ते 19 जणांनी रविवारी रात्री माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव या गावातील हिंमतराव पाटील यांच्या घरी कळंब पंचायत समितीचे काही सदस्य असल्याच्या संशयावरुन हिंमतराव पाटील यांच्या घरी जाऊन त्यांना आमदार राणा जगजीतसिंह पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या इतरांनी मारहाण केली. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी हिंमतराव पाटील यांच्या डोक्याला बंदूक लावून धमकी दिल्याची तक्रार हिंमतराव पाटील यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली आहे. अकलूज पोलीस ठाण्यात आमदार राणा जगजीतसिंह पाटील, सतीश दंडनाईक, गणेश भातलवंडे, दयाशंकर कंकाळ, धीरज मुकुंद वीर, मनोगत शिनगारे, अरुण चौधरी, प्रणव चव्हाण, दत्तात्रय साळुंके, मेघराज देशमुख, पोपट चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी हिंमतराव पाटील यांच्या घरी जात गोंधळ करीत मारहाण करत असताना झालेल्या गोंधळामुळे परिसरातील गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी आमदार पाटील समर्थकांना पकडायला सुरुवात करताच आमदार पाटील हे त्यांच्या टोयोटा लँडक्रूझर गाडीतून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच यावेळी गावकऱ्यांनी धाराशीव जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक गणेश भातलवंडे यांच्यासह इतर दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
























































