
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्याने जेष्ठ नागरिक खाली पडले. त्यामुळे त्यांनी जाब विचारल्याचा राग आल्यामुळे बेदम मारहाण केल्याप्रकरणी संभाजीनगर जिल्हयातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्यासोबत असणार्या इषा झा यांच्याविरूध्द चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय 28 रा. भाऊ पाटील रोड, बापोडी,) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हर्षवर्धन रायभान जाधव (वय 43, रा. बालेवाडी ) आणि इषा बालाकांत झा (वय 37, रा. वाकड) यांच्याविरूध्द चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अमन चड्डा यांचे आई आणि वडिल दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्या रोडवरून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी जाधव यांनी चारचाकी गाडीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे चड्डा खाली पडले. त्यामुळे चड्डा यांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला.
जाब विचारल्त्यायाचा राग आल्यामुळे जाधव यांच्यासह झा यांनी चड्डा यांच्या वडिलांचे ऑपरेशन झाले असतानाही त्यांच्या छातीमध्ये तसेच पोटामध्ये लाथा मारल्या. दोघांनी मिळून चड्डा यांच्या आई वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा मारून जखमी केले. त्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दहिफळे करीत आहेत.
मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्याने चड्डा दाम्पत्याने हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे त्यांच्यासह एका महिलेने चड्डा दाम्पत्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
– राजेंद्र दहिफळे, सहायक पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे





























































