संचारबंदी कायदाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चापोलीजवळ असलेल्या ब्रह्मवाडी (ता. चाकूर) येथील सात जणांवर चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सातही जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ब्रह्मवाडी येथील व सध्या डिग्गी (ता. ऐरोली जि. ठाणे ) येथे वास्तव्यास असलेले मारोती विजयकांत कांबळे, धोंडीबा शंकर हाळनर, हरीबा ज्ञानोबा कांबळे, जया हरीबा कांबळे, संभाजी हरीबा कांबळे, ज्ञानेश्वर हरीबा कांबळे, राणी वैजनाथ सूरणर हे मंगळवारी ब्रम्हवाडी येथे आले होते. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी या कायद्याचे उल्लंघन करत मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत ते ठाणे जिल्ह्यातून ब्रम्हवाडी येथे आले होते. याची पोलीस प्रशासनाला कुणकुण लागल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, बीटजमादार सुभाष हरणे, माधव सारोळे ब्रम्हवाडी येथे येऊन त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर या सातही जणांवर पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.