कोरोनाग्रस्तांकडून जादा बिल आकारणी; अशोका हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने चार कोरोनाबाधितांकडून जादा दर आकारणी केली. महापालिकेच्या सूचनेनंतरही ज्यादा बिलाचा 3 लाख 80 हजार रुपयांचा परतावा न केल्याने हॉस्पिटलविरुद्ध महापालिकेतर्फे बुधवारी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांवर उपचारासाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. मात्र, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने 24 मे ते 7 जून या कालावधीत उपचार घेतलेल्या रुग्णाकडून जादा सवालाख आकारल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली होती. त्यानुसार 11 जून रोजी हॉस्पिटलला नोटीस देऊन सात जुलैपर्यंत पैसे परत देण्याच्या सूचनाही केल्या. पैसे परत न केल्यास कारवाईचा इशाराही 17 जुलै रोजी देण्यात आला.

अशाच प्रकारे या हॉस्पिटलविरोधात अन्य तीन रुग्णांच्या 16 हजार 979, 77 हजार 920 व 1 लाख 59 हजार 670 रुपये जादा आकारण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. वारंवार सूचना देऊनही रुग्णालयाने ते अतिरिक्त पैसे मुदतीत परत केले नाहीत. त्यामुळे महापालिकेचे विजय शाळीग्राम तितरे यांच्या फिर्यादीवरून 30 सप्टेंबर रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरुद्ध साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम दोन व तीन, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 मधील विविध तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.