
भोकरदन तालुक्यातील नळणीवाडी शिवारातील गट १७३ मधील कपाशीच्या शेतात पोलिसांनी छापा टाकून १९ किलो ८०० ग्राम असा एकून अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपयांचा गांजाचा साठा जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (8 डिसेंबर 2025) दुपारी 2 च्या दरम्यान पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, भोकरदन तालुक्यातील नळणीवाडी शिवारात गट १७३ मधील कपाशी पिकात ५ फुटांवर २१ गांजाची झाडे लावण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ड्रोनद्वारे परिसरातील शेतीची पाहणी केली. शेतामध्ये गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि घटनास्थळावरून राजु किचरू सिंघल (52) या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.नितिन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या पथकासह पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मागील काही तासांपासून चर्चा रंगत आहे. यावेळी शासकीय पंच म्हणून नायब तहसीलदार बालाजी पोपलवाड, तलाठी योगेश उदार आणि कृषी विभागाकडून अंकुश भोंबे आदी उपस्थित होते. ही कारवाई उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक, रामेश्वर सिनकर, किशोर मोरे, शरद शिंदे, शिवाजी जाधव आदींनी केली आहे.































































