राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार; निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

राज्यातील काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशी आहेत.  ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर व इतर नावे देण्यात येतील.

जातिवाचक नावांच्या ऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय महत्त्वाकांक्षी व राज्याच्या सामाजिक सलोख्यावर सकारात्मक परिणाम करणारा असल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती नेमण्याचा निर्णय राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. या समितीची तीन महिन्यांतून किमान एकदा बैठक होईल, तर दर महिन्याला आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या निर्णयाचा एक भाग म्हणून  यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.