भाजपच्या ४ नगरसेवकांचे भवितव्य राज्य सरकारच्या हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

महापालिका निवडणुकीत आरक्षित जागेवरून निवडून आल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातप्रमाणपत्र सादर न केलेल्या चार भाजप नगरसेवकांची माहिती राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविली आहे. त्यामुळे या चारजणांचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या मुदतीत म्हणजे २२ ऑगस्ट २०१७ पर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते, परंतु दिलेल्या मुदतीत भाजपच्या चार नगरसेवकांनी हे प्रमाणपत्र सादर केले नाही.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत चिखली प्रभाग क्रमांक ‘एक-अ’ या राखीव जागेवरून भाजप उमेदवार कुंदन गायकवाड, तर धावडेवस्ती, भगतवस्ती, भोसरी प्रभाग क्रमांक सहा ‘एक-अ’ येथून यशोदा बोईनवाड निवडून आले.

या दोन्ही नगरसेवकांनी दीड वर्ष होत आले, तरी जात प्रमाणपत्र सादर केले नाही, तसेच शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगर प्रभाग क्रमांक २३ ‘एक-अ’ मधून मनीषा पवार व निगडी गावठाण, यमुनाननगर प्रभाग क्रमांक १३ ‘एक-अ’मधून कमल घोलप निवडून आल्या होत्या. या दोन्ही भाजप नगरसेविकांनी सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर जातप्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे आता या चारही नगरसेवकांचे भवितव्य राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या हातात आहे. कोल्हापूरपालिकेमध्ये आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांनी ६ महिन्यांच्या मुदतीत जातप्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने १९ नगरसेवकांचे पद रद्द केले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पालिकेतील मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांची माहिती राज्य सरकारने मागवून घेतली आहे.

निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, परंतु महापालिकेतील ४ नगरसेवकांनी दिलेल्या मुदतीत ते सादर केले नाही. तसेच अजून २ नगरसेवकांनीदेखील अद्यापि प्रमाणपत्र दिले नाही. याची माहिती राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. मंगळवारी (दि. ११) आठवणपत्र पाठविले असून, नियम ५ (ब) नुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस केली आहे. त्यानुसार नगरसेवक पद रद्द करण्याबाबत राज्य सरकार जे निर्देश देईल, त्यानुसार कारवाई होईल.

– डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका