
चीनला धडा शिकवण्यासाठी सणासुदीच्या काळात चीनच्या 40 हजार कोटी रुपयांच्या मालाची विक्री तात्काळ थांबवण्याची घोषणा व्यापाऱ्यांच्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संस्थेने घेतला आहे. हिंदुस्थानींनी देशी वस्तूच खरेदी कराव्यात असे आवाहनही कॅटने केले आहे.
‘भारतीय सामान, हमारा अभिमान’ हे अभियान हिंदुस्थानी व्यापाऱ्यांनी सुरू केले आहे. सणाच्या काळात चीनमधून येणाऱ्या देवी-देवतांच्या मुत्र्या, अगरबत्ती, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, फटाके, कलात्मक दिवे यांची 35 ते 40 हजार कोटी रुपयांची विक्री देशात होते. ही विक्री थांबवून देशी वस्तूंच्या विक्रीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे, असे ‘कैट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.
कॅटच्या इकोफ्रेंडली मूर्ती
या वर्षी हिंदुस्थानशी उभा दावा ठेवणाऱ्या चीनचा माल देशात विकायचाच नाही असा निर्णय देशातील व्यापाऱ्यांची संघटना कैटने घेतला आहे. या निर्णयाचा श्रीगणेशा म्हणून यंदा गणेशोत्वासाठी कॅटने मातीच्या इको फ्रेंडली (पर्यावरणपूरक) मूर्ती बनवल्या आहेत. ‘पर्यावरण मित्र गणेशजी’ या नावाने भक्तांसाठी विक्रीला ठेवलेल्या या सुंदर मूर्ती शाडूची माती, शेण आणि खाद्यान्नापासून बनवण्यात आल्या आहेत.
























































