
मुक्या जीवांवर जीवापाड प्रेम करणाऱयांची संख्या काही कमी नाही. प्राण्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम दिले जाते. पाळीव प्राण्यांचे लाड करण्यापासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. प्रयागराज येथील मोहम्मद ताहिर यांच्या कुटुंबाच्या प्राणीप्रेमाची अशीच चर्चा रंगली आहे. ताहिर यांच्या घरातील मांजर हरवल्यापासून त्यांचे कुटुंब दुःखी झाले आहे.
लाडकी लुसी गायब झाल्याने ताहीर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जेवण सोडले आहे, ते रडत आहेत. लुसीला परत आणणाऱयाला त्यांनी 10 हजार रुपये इनामही घोषित केले आहे. तसे पोस्टर त्यांनी शहरातील भिंतीवर, मार्केट परिसरात लावले आहेत. दीड वर्षांपासून लुसी आमच्या कुटुंबाचा भाग बनली होती. तिच्या जाण्याने आम्ही व्यथित झालो आहोत. कुणाला ती सापडली तर घरी सोडावे आणि बक्षीस घेऊन जावे, असे ताहिर यांनी म्हटले आहे.



























































