केरळमध्ये पुरानंतर रोगांचे महासंकट; 50 मृत्युमुखी

12

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम

केरळमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर आता साथीच्या आजारांचे महासंकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत 50 जणांचा दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली असून सहा जण दगावले आहेत. अन्य 34 जणांच्या मृत्यूचे कारणही लेप्टोस्पायरोसिसच असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 केरळमध्ये नऊ जण तापामुळे तर एक जण डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडला आहे. लेप्टोस्पायरोसिसग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टपासून आतापर्यंत एकूण 159 जणांना लेप्टोस्पायरोसिसने ग्रासले आहे. आतापर्यंत पुरामुळे 104 लोकांना डेंग्यू आणि 50 हून अधिक जणांना मलेरिया झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली.

पुराने ढासळल्या मतभेदाच्या भिंती

 केरळातील पुरामुळे हजारो घरे कोसळून लाखो लोक बेघर झाले. कोट्यवधी रुपयांचे जनतेचे आणि सरकारचेही नुकसान झाले, मात्र या महापुरामुळे लोकांतील मतभेदाच्या भिंतीही ढासळून गेल्या आणि माणुसकीचे दर्शनही घडले. पुरामुळे चर्चमध्ये आसरा घेतलेल्या लोकांना मशिदीतील मौलवी आणि तरुणांनी अन्नपुरवठा करून मोठी मदत केली. मशिदीतील लोकांचे आभार मानण्यास गेलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंना तेथील मुस्लिम धर्मगुरूंनी आपल्या व्यासपीठावरून भाषण करण्याची संधी देत सर्वजण एक आहोत असा संदेश आपल्या कृतीतून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या