
कोंडवाडा नसल्याने शहरात मोकाट जनावरांनी रस्त्यांचा ताबा घेतला आहे. त्यात आता मोकाट कुत्र्यांचीदेखील भर पडली आहे. कुठल्याही क्षणी मोकाट कुत्रे हल्लाबोल करतात. त्यामुळे रस्त्यावरून फिरणारी लहान मुलेच नव्हे तर वयस्करदेखील धास्तावली आहेत. महापालिकेने मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांना निर्भयपणे रस्त्यावर फिरता यावे अशी अपेक्षा धुळेकर व्यक्त करीत आहेत.
शहरातील मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई व्हावी म्हणून मनोहर चित्रमंदिरासमोर कोंडवाडा होता, परंतु महापालिकेने कोंडवाडा हटवून तेथे व्यापारी संकुल उभारले. त्यामुळे जनावरांचे पालन-पोषण करणाऱयांना चांगलेच फावले. दुभत्या गाईंसह गुरेदेखील मोकाट सोडली जातात. विशेषतः कळपाकळपाने फिरणारी ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. कधी कधी ही मोकाट जनावरे उधळतात आणि सैरभैर धावतात. त्यात अनेक जण जखमी होतात. कोंडवाडा नाही आणि दंडात्मक कारवाई नाही त्यामुळे जनावर मालकांवर कुठलाही धाक राहिलेला नाही.
शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात आता मोकाट कुत्र्यांचीदेखील दहशत निर्माण झाली आहे. हे कुत्रेदेखील झुंडीने फिरतात. शाळा सुटण्या आणि भरण्याच्या वेळी मोकाट कुत्री शाळकरी मुलांना त्रास देतात. मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. श्वान दंश प्रतिबंधक लस वेळीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिक अधिक धास्तावले आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी मोकाट कुत्र्यांवर महापालिकेने निर्बिजीकरणाची मोहीम राबविली होती, पण त्यानंतर आता रस्त्यांवर फिरणाऱया कुत्र्यांच्या झुंडी पाहिल्यानंतर महापालिकेने पुन्हा प्रभावी काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा धुळेकरांची आहे.

























































