
चंदिगडमधील आयआरएसमधील वरिष्ठ आयकर अधिकारी अमित कुमार सिंघल यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली असून यात अधिकाऱ्यांना पैशांचे घबाड सापडले. दिल्लीतील वसंत कुंज येथील घरात साडेतीन किलो सोने, दोन किलो चांदी, एक कोटी रुपयांची रोकड आणि अनेक संपत्तीची कागदपत्रे आढळून आली आहेत. सोने-चांदीची किंमत जवळपास चार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
अमित सिंघल यांची मुंबई, दिल्ली, पंजाबच्या लुधियाना, मोहाली, बठिंडा, जीरकपूर आणि न्यू चंदिगडमध्ये अनेक संपत्ती आहे. सीबीआयने शनिवारी अमित सिंघल आणि हर्ष कोटकला 25 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. 2007 च्या बॅचमधील आयआरएस अधिकारी सिंघल सध्या दिल्लीत आयकर विभागात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहे. अमित सिंघल यांनी लाचेची मागणी केल्यानंतर सनम कपूर यांनी सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने सापळा रचून या दोघांना अटक केली.
कोपनहेगन हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि ला पिनोज पिज्जा फ्रेंचाइजीचे मालक सनम कपूर यांना ब्लॅकमेल करून सिंघल यांनी लाचेची मागणी केली होती. कपूर यांना 18 फेब्रुवारी 2025 ला आयकर विभागाकडून एक नोटीस मिळाली होती. टॅक्समध्ये सूट देण्यासाठी 45 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. लाच दिली नाही तर कायदेशीर कारवाई करणे, मोठा दंड आकारण्याची धमकी दिली होती.