CBI च्या 19 अधिकाऱ्यांची बदली

959

केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ऋषीकुमार शुक्ला यांनी गुरूवारी 19 वरीष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली. त्यामध्ये दोन पोलीस उपमहानिरीक्षक, 14 पोलीस अधीक्षक आणि तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्या जनतेच्या भल्यासाठीच केल्या असल्याचं ऋषीकुमार शुक्ला यांनी सांगितले. केंद्रीय अन्वेषण विभागाने बदलीबाबतच्या धोरणांमध्ये नुकताच बदल केला आहे. या बदलानुसार कोणताही अधिकाऱ्याला एकाच ठिकाणी सलग पाच वर्षापेक्षा जास्तकाळ काम करता येणार नाही. या बदलेल्या निर्णयानुसारच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सीबीआय अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या करण्यात आल्या आहे त्यामध्ये विवेक प्रियदर्शी यांचा समावेश आहे. प्रियदर्शी हे 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करत होते. प्रियदर्शी यांची जागा अधीक्षक पार्थ मुखर्जी घेणार आहे. मुखर्जी हे कोलकात्यामध्ये नियुक्त होते आणि ते चिटफंड घोटाळ्याची चौकशी करत होते. अधीक्षक सुधांशू धार मिश्रा हे ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावर आरोप असलेल्या कर्ज घोटाळा प्रकरणाची चौकशी करत होते. धार यांची बदली आता दिल्लीतील आर्थिक गुन्हे युनिट क्रमांक 2 मध्ये करण्यात आली आहे.

मुझफ्फरनगरमध्ये बालगृहातील लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण तपासासाठी पोलीस उपमहानिरीक्षक अभय सिंह यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांनाही धार यांच्याप्रमाणे दिल्लीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत आणण्यात आले आहे. सीबीआयच्या अतिसंवेदनशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख असलेल्या नितीन दीप ब्लागान यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 5व्या युनिटचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे विभागातील पोलीस अधीक्षक विजयेंद्र बिद्री यांची बदली इंटरपोल समन्वय विभागात करण्यात आली आहे. ऑगस्टा वेस्टलँड आणि विजय मल्ल्यासंदर्भातील प्रकरणांचा तपास करणाऱ्या किरण एस. यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिट 5 मध्ये करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या