CBSE की स्टेट बोर्ड…

>> सामना प्रतिनिधी

शालेय शिक्षण हा शिक्षणाचा पाया… सध्या सीबीएसई की स्टेट बोर्ड? कोणत्या शिक्षण पद्धतीची निवड करावी? या विचाराचा गोंधळ प्रत्येक पालक-विद्यार्थ्याच्या मनात सुरू असतो. सीबीएसई चांगले की स्टेट बोर्ड… कुठे प्रवेश घ्यावा हे बऱयाचदा पालकांना कळत नाही. त्यातच इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व, करीअरच्या विस्तारणाऱया शाखा, स्टेट बोर्डातून शिक्षण घेतले तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची वेगळी तयारी करावी लागणार… असे अनेक प्रश्न अॅडमिशनच्या काळात मनात सतावत असतात. आपले मूल घेत असलेले शिक्षण नैतिक मूल्यांची जोपासना करणारे आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शक असायला हवे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक मार्गदर्शक आपण प्रवेश घेत असलेल्या शाळेत आहेत का हेही पालकांनी तपासायला हवे. या विषयावर आधारित काही विद्यार्थी आणि शिक्षणप्रमुख यांची मते जाणून घेऊया.

सराव महत्त्वाचा
स्टेट बोर्डाचं शिक्षण घेत आहे याविषयी मला कमीपणा वाटत नाही. अभ्यास करायलाही सोपं जातं. सीबीएसईची निवड केली नाही म्हणून करीअरवर किंवा पुढील अभ्यासावर याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. असा काही विचारही मनात येत नाही. सीबीएसईची निवड केली तरच इंग्लिश बोलता येईल, असं वाटत नाही. स्टेट बोर्डातलेही काही विषय कठीण वाटतच असतात. मला इंग्रजी आवडतं. त्यामुळे इंग्रजी भाषेचा सराव केला तर कोणताही अभ्यासक्रम सोपाच जाईल. प्रसिद्ध व्यक्तीही स्टेट बोर्डात शिकूनच मोठय़ा झाल्या आहेत.
– भूषण शिरवडकर

करीअरवर परिणाम नाही
स्टेट बोर्डाचा ८ वीपर्यंतचा अभ्यास सोपा आहे. ९ वी १० वीचा अभ्यास कठीण वाटतो. तरीही शिकण्यासाठी हा अभ्यासक्रम सोपा आहे. लहानपणापासून मी स्टेट बोर्डाचाच अभ्यास करतेय. त्यामुळे सीबीएसईचं आकर्षण मला वाटत नाही. तसेच या अभ्यासक्रमाची निवड केली नाही म्हणून करीअरमध्ये अडथळे येतील असे वाटत नाही.
– नूपुर अनगत

सीबीएसई अभ्यासक्रम योग्य
अन्य बोर्डांपेक्षा मी सीबीएसईला प्राधान्य देईन. १ ली ते ८ वीपर्यंत आमच्या शाळेत सीबीएसईची पुस्तके अभ्यासायला होती, पण ९ वी १० वीच्या वर्गांना स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम आहे. करीअरसाठी सीबीएसईचा अभ्यासक्रम योग्य आहे. सीबीएससीच्या अभ्यासक्रमांमध्ये भरपूर माहिती असते, पण मला सीबीएसई आणि स्टेट बोर्ड दोन्हीचा अभ्यास करायला मिळतोय यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. त्याकरिता दोन्ही अभ्यासक्रम शिकवणारे प्रशिक्षित शिक्षकही आमच्या शाळेत आहेत.
– ईशा मौजे

अभ्यास कंटाळवाणा नाही
सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरुवातीपासूनच करत असल्यामुळे मला तो सोपा वाटतो.अभ्यास करावासा वाटतो. कठीण वाटत असलं तरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जमतं. सीबीएसई सोडून स्टेट बोर्डला प्रवेश घेऊया असं वाटत नाही. लहानपणापासूनच या अभ्यासक्रमाची निवड केल्यामुळे यानंतरचा अभ्यास कंटाळवाणा होईल असं वाटत नाही.
– स्मित पवार

प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता
सीबीएसईचा अभ्यास करणारी ६० ते ७० टक्के मुले यूपीएससी परीक्षेत पास झाली आहेत. सीबीएसईच्या अभ्यासाप्रमाणेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असतो. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी व्यवस्थित प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता आहे, कारण ही एक शिक्षण पद्धती असून तिचा अभ्यास व्यापक आहे. मात्र हा अभ्यास शिकवणाऱया शिक्षकांची कमतरता असेल तर मुलांना अभ्यास जड जाऊन वर्गात शिकवलेलं त्यांच्या काहीच लक्षात येणार नाही. दरवर्षी सीबीएसईचा अभ्यास वाढत जातो. त्यामुळे मुळात पाया जर कच्चा असेल, शिकवणारे त्या पातळीचे नसतील तर काहीच उपयोग नाही. बहुसंख्य शाळांमध्ये फी जास्त घेता येते या कारणामुळे सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केला आहे, पण त्या दर्जाचे शिक्षक तिथे नाहीत असं आढळून येतंय. फक्त पुस्तक वापरून अभ्यास म्हणजे शिक्षण नव्हे, तर ती एक वेगळी शिक्षण पद्धती आहे. त्यासाठी शाळेतही आवश्यक साधनसामग्री उपलब्ध हवी. पालक शिकलेले नसतील तर क्लासवर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शाळा-क्लास हे सायकलच तयार होतं. राज्याचा अभ्यास पॅटर्नही चांगलाच आहे. राज्याच्या अभ्यासामुळे इथल्या संस्कृती, भूगोल इत्यादींची माहिती मिळते. सीबीएसईचा हाही एक तोटा आहे की, ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची ओळख होत नाही. त्यामुळे आईवडील सुशिक्षित आहेत, त्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे त्यांनी सीबीएसईला जावं. प्रत्येकानेच ही शिक्षण पद्धती निवडण्याची आवश्यक नाही. त्यामुळे सीबीएसई घेतलं तरच प्रगती होईल असं वाटत नाही.
– भूषण देशमुख