
मुंबईचा प्रवास वेगवान करणाऱया कोस्टल रोडवर आता सुरक्षेसाठी तब्बल 236 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱयांच्या माध्यमातून वाहनांच्या वेगाची माहिती, अपघातांवर नजर ठेवण्यात येत असून सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे.
पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेला स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज मुंबई किनारी रस्ता हा टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून आता संपूर्ण सुमारे 10 किमीचा मार्गावर वेगवान वाहतूक सुरू आहे. या मार्गावर सुरक्षेची काळजीदेखील घेण्यात आली आहे. या प्रणालीमुळे मुंबई किनारी रस्त्यावर कोठेही अपघात झाला तर नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती मिळते आणि अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध होते. तसेच दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली याचीही नोंद या कॅमेरा प्रणालीमुळे ठेवण्यात येत आहे.
अशी आहे सुरक्षा व्यवस्था
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. या मार्गाच्या प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत चार प्रकारचे वैशिष्टय़ असलेले, एकूण 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.