गो…ड पसारा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर,[email protected]

याच क्षेत्रात फक्त कॅमेराच्या मागे असल्यानं पटकन सोहा कुलकर्णी लक्षात येणार नाही… पण आम्हा कलाकारांनी दिसावं, सुंदर दिसावं आणि आमचं दिसणं, असणं, वागणं कॅरेक्टर रूपात सुस्वरूप आणि उत्तमरीत्या तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून भागमभाग करणारी, झटणारी सोहा… कारण इतका वेळ नीनाताईंची मुलगी असाच सतत उल्लेख होत होता… पण सोहा इतकी झटापट सांभाळून कोको, शॅम्पा आणि आईचेही लाड पुरवतेय…

‘अगं कामाच्या निमित्तानं आणि विचित्र शेडय़ुल्समुळे, ऑफिस जवळ म्हणून गोरेगावला राहायला गेले… खरं तर दिवसभर थकून आल्यावर झोपणे इतकाच त्या घराशी संबंध. सुट्टी असली की माहीम… पण तरीही लहानपणापासून सतत घरात पेट असल्यामुळे दरवाजा उघडल्यावर कुणीतरी धावत येऊन अंगावर उडी मारायची सवय होती… पण इथे मी खूप ते मिस करायला लागले… फिश टँक घेऊ की, डॉगी घेऊ, का छोटं कासव ठेवू… खूप खूप हवं होतं कोणीतरी. आणि पत्ता लागला की एक फॅमिली आहे ती दुबईला शिफ्ट होतेय. त्यांच्याजवळ असणाऱया त्या ब्रिटिश शॉर्टहेअरचं करायचं काय… म्हणून तिला ऍडॉप्शनसाठी विचारत होते आणि सोहा प्राण्यांसाठी त्यांच्या ऍडॉप्शनसाठी विचारत होते. आणि सोहा प्राण्यांसाठी, त्यांच्या ऍडॉप्शनसाठी, रेस्क्यूसाठी इतकं करते की नॅचरली त्या मैत्रिणीनं ‘कुणाला हवंय का ग?’ म्हणून विचारले.

‘माझ्या मैत्रिणीनं मला फोटो पाठवला आणि ओ माय गॉड (आई शप्पथ) झालं गं! गोरी गोरी पान… स्वच्छ कापसासारखी मऊ मऊ दिसत होती. म्हटले मी ठेवते. थोडे दिवस फॉस्टरिंग करायला. सो आली ती घरी आणि मग ती आलीच… खरंच ती आली तेव्हा इतकं भरल्यासारखं वाटलं घरी अचानक कारण मस्तीशी मी खूपच अटॅच होती. ती गेल्यापासून आपलं म्हणून माझं माणं एक पेट असावं असं नेहमी वाटायचं आणि आलं आता ते कोको…

इतका वेळ त्या टीव्हीच्या वरच्या शेल्फवर शांतपणे सावरून पहुडलेल्या त्या गोऱया गोऱया पोरीचे कान टवकारले… शॅम्पा बाहेर आहे याचा अंदाज घेऊन टपकन उडी मारली. पायाशी आली. पायात घुटमळली आणि जणू चला आता माझ्याबद्दल बोला असा हुकूम सोडत आमच्याकडे बघत बसली. बरं उचलून घेतलं तरी मांडीवर बसायचं नव्हतं. नेमके काय बोलताय माझ्याबद्दल एवढं… फक्त तेच ऐकायचं होतं जणू… इतकी गंमत वाटली.

‘कोको जीवा’ हे तिचं खरं नाव. खरं तर आली तेव्हा मी काही एवढं विचारलं नाही. मला वाटलं मेल कॅट आहे म्हणून जीवा नाव ठेवलं… काही दिवसांनी डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं हा ‘ती’ आहे. मग जीवाची ‘कोको’ झाली. दरम्यान माहीमला आमची आज्जी गेली. क्लोओ पण म्हातारी झाली. आईला एकटं एकटं वाटायला लागलं. सो मी पुन्हा इथं शिफ्ट झाले… क्लिओ आणि कोकोचं वेगळं नातं झालं, पण क्लिओ गेल्यावर कोकोनं क्लिओची जागा घेतली… मांजर ऍक्च्युली आमच्या कुत्र्यासारखं वागायला लागले, जे एरव्ही एखादं मांजर कधीच करणार नाही ते… आईला चिअरअप कोको करायची, क्लिओची पोकळी भरून काढायला. बेल वाजली की दाराकडे पळत सुटायची, येऊन अंगाशी घुटमळायची, क्लिओच्या जागेवर बसायची.

सोहा आणि नीनाताई प्राण्यांशी कम्युनिकेट करतात. वेगळंच वाटलं ना… वेगळंच आहे. हो… सोहा सांगते त्यांचं काय आहे… काय बोलायचंय काय आवडत नाहीये… दोन दिवसांचा पुण्यात कोर्स केल्यावर जेव्हा क्लिओशी कम्युनिकेशन केलं तेव्हा ती म्हणाली, ‘माझा आधी बेड बदला… तो खालून फाटलाय’ आणि खरंच गं… माझ्या झोरोशी पण बोलली तेव्हा तो म्हणाला, ‘माझं ओरेंज आणि यल्लो क्लोथसारखं काहीतरी मम्मानी म्हणजे मी ठेवलंय ते परत हवय… मला’ कळेचना आधी काय, नंतर लक्षात आलं त्याचा बेड दोन दिवस खूप गरम होत तर केला नव्हता… तो हवा होता त्याला.

एका मैत्रिणीच्या डॉगनं तिच्या आईच्या चेहऱयावर दात मारले होते. अत्यंत चिडचिड करायचा, गुरुगुरायचा तर मी त्याच्याशी बोलले… तो म्हणाला आधीच्या फॅमिलीनं माझ्याशी मला अत्यंत वाईट वागणूक दिलीये. डोक्यावर चादर घालून ढकललंय, मारलयं, ओरडलेत, उपाशी ठेवलंय, घराबाहेर बसवले त्यामुळे माझा कोणावर विश्वास नाहीये आता. मला लोकांचा राग आलाय, भीती वाटतेय. प्लीज माझ्याजवळ येऊ नका. मला कम्फर्टेबल वाटलं की मी येईन स्वतःहून तुमच्याकडे. प्लीज माझ्याकडे दुर्लक्ष करा… आणि त्याचं ऐकल्यावर काही दिवसांनी तो बदलला. त्याला जाणवलं की या घरातली सगळी प्रेमळ आहेत.

कसलं कम्माल स्कील आहे ना हे… सतत बोलत असताना खूप खूप जाणवलं की, आपलं घर रुक्ष सॅड जरी बोअरिंग झालंय. मस्ती करायला कोणीतरी हवं आहे. कोकोनंतर आईनं तर पक्क ठरवलं होतं घरी कुत्रा आणायला नाही… त्याचं करायला आता तब्बेतीला झेपणार नाही आणि मी कुत्र्याशी (बेबीशी) अप्रामाणिक/अनफेअर नाही राहू शकत. पण… अशातच मधुगंधा कुलकर्णीचा फोन आला… आणि २०-२० मॅच कधी एका ओवरमध्ये फिरते तसं फुल्ल ३६० मध्ये वातावरण बदललं… ३ महिन्यांची आमची मरगळ गेली. मिनी डॅश हाउंडचं हे पिल्लू बास्केटमध्ये बसून माझ्या ऑफिसमध्ये आणि तिथून घरी आलं, पण लॅब मोठ्ठी ब्रिड असल्यानं आणि आमच्याकडे सतत मोठं डॉगस् असल्यानं छोटं बेबी घेऊया… असा विचारही सुचलाच नव्हता कधी… शॅम्पाचा फोटो बघेपर्यंत!!!

शॅम्पाजी आल्या, घर बिर फिरल्या, ओके… आता मला इथे राहायचंय का या कोको बयेबरोबर..? असा फील देऊन कार्पेटवर येऊन बसल्या… जणू काही ठीक आहे मी तुम्हाला मान्य केलंय माझी काळजी घेण्यासाठी आणि एक जान आ गयी झालं घराला… तरीही मला (नीनाताईंना) अजून तेवढी अटॅचमेंट वाटत नव्हती. क्लेओ गेली त्या दिवशी झालेला शॅम्पाचा जन्म 18 फेब्रुवारी आणि शॅम्पाचं पूर्वीचं असलेले रोझी नाव या इतक्या साम्यापलीकडे खूप काही नव्हतं. पण एक दिवस दरवाजा उघडला समोर शॅम्पा दिसली आणि एका सेकंदात गायब… दरवाजा लावून आत आले घरभर शोधलं. सापडेचना… अक्षरशः गार पडले होते. बाहेर शोधायला म्हणून दरवाजा उघडला तर ही ठमा आम्हाला गॅसवर ठेवून बसली होती समोर. त्याक्षणी जाणवलं… हिच्या असल्या आणि येण्यापलीकडेही वाटतंय खूप बदलल्यावर ती कम्फर्टेबल झाली. हिच्याबद्दल पण व्यक्त होता येत नव्हतं मला… घरात येणाऱया प्रत्येक डॉग एक पर्पस घेऊन आलेला असतो. निखळ आनंद देण्यापलीकडचं पर्पस…

मदर्स डेच्या दिवशी सोहानं मला दिलेले हे क्युटुलं गिफ्ट शॅम्पा आणि गुबरी गुबरी कोको घरी आली आणि अस्ताव्यस्त पडलेला गोड पसारा आमच्या आयुष्यात परत आला…