जिवलग…जीवाशिवाचं नातं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर

गीतांजली-अतुल कुलकर्णी यांचं ऐसपैस कुटुंब… गावाकडचं… जीवा, जिप्सी, जाई-जुई हे कुटुंब मनाच्या अतूट धाग्याने एकमेकांशी बांधलं गेलं आहे…

‘मुंबईतल्या घडय़ाळाच्या काटय़ावर चालणाऱया, ट्रॅफिक जामच्या फुल नेटवर्क असल्यामुळे सतत खणखणणाऱया फोनच्या धुरानं आणि सिमेंटच्या जंगलाने वेढलेल्या आयुष्यापासून काही किलोमीटर अंतरावर वाडय़ाजवळ सोनाळा गावात घर आहे आमचं. फार्म हाऊस म्हटलंस तरी चालणारेय. जिथे घरात पिकलेल्या भाज्या, ‘ये रे’ म्हटल्यावर कुठलाही विचार न करता धावून येणारी माणसं, पक्ष्यांचा किलबिलाट, शुद्ध, स्वच्छ हवा आणि आपल्याला हवं तसं, हवं तेव्हा फिरवता येणारं घडय़ाळ. मस्त वाटतं अगं इथे. मुंबईत फार काही काम नसलं की, पळत मी इथे येते. मला खूप आवडतं इथं. एका एनजीओसाठीही काम करत असल्याने तेही इथेच असतं. आजूबाजूची पाडय़ातली छोटी छोटी निरागस मुलंसुद्धा मग इथं येतात आमच्या मुलांशी खेळायला. जाई, जुई, जीवा आणि जिप्सी… आमची चार गोड आणि तितकीच डांबरट मुलं’’ गीतांजली म्हणाली. तर गीतांजली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी आणि त्यांची पिलं आहेत आपले आजचे जिवलग!

‘‘जोपर्यंत तुम्ही एखाद्या पेटबरोबर आयुष्यातला काही काळ घालवत नाही तोपर्यंत तुमचा आध्यात्मिक प्रवास पूर्ण होत नाही, असं एका फ्रेंच तत्त्ववेत्त्याने म्हटलंय. मी या मताशी सहमत आहे’’ अतुलदादा म्हणाले ‘‘खरं तर अदिती, मी पूर्वीपासून काही ऑनिमल लव्हर वगैरे नव्हतो आणि व्यक्ती म्हणूनही मी खूपच प्रॅक्टिकल आणि लॉजिकनं चालणारा स्थितप्रज्ञ. जरा कठीण वाटतंय ना, पण असा माणूस असल्याने कधी समोर आलेल्या प्राण्याला गोंजारायला गेलो नाही आणि झिडकारलेही नाही, पण सोनाळ्याला घर बांधल्यावर असं जाणवलं की, तिथं गार्ड डॉग ठेवायला पाहिजे आणि हे जेव्हा ठरवलं तेव्हा घरात कुत्रा आणणं म्हणजे नक्की काय असतं, उगाच आणला, दोन वेळा जेवायला दिलं, फिरवलं की, संपलं असं नसतं. त्याची मानसिकता समजून घेण्यासाठी डॉक्टरकडे गेलो. आपण तो पेट नक्की का आणतोय, घरी त्याची कारणं महत्त्वाची असतात गं…’’

‘‘सोनाळ्यात ना, आधी जीवा आला. मिक्स्ड ब्रीड असणारा जीवा मोठा डॉग होईल असं वाटलं होतं, पण तो इवलुसाच झाला. आधी ते आमच्या गोरेगावच्या घरी होतं. आमची त्याला आणि त्याची आम्हाला सवय होईपर्यंत. त्या तीन महिन्यांत सगळं बाळंतपण काढलं. व्हॅक्सिनेशन्स, उलटय़ा, जुलाब, चिडचिड, दात येण्याची प्रोसेस, मित्रांच्या मदतीने सगळं उत्तम निभवलं आणि मला खूप शिकवून गेलं. मग इथे सोनाळ्यात जीवासाठी एक छान आऊटहाऊससारखं घर बांधलं. हवेशीर, मोकळी बंगली, पण तो मात्र आमच्याबरोबरच, घरात!’’ गीतांजली म्हणाली, ‘‘आमच्या फार्मवर लक्ष्मण नावाचे काका आहेत. त्यांना काही कुत्रे आवडायचे नाहीत. जीवा पण नाही. जीवा मात्र मनापासून प्रेम करतो सगळ्यांवर. एक दिवस अंधारात बाहेर लक्ष्मण काहीतरी काम करत होते. अचानक जीवा भुंकायला लागला. लक्ष्मण थोडे मागे सरकले तसा तो धावत येऊन अजूनच भुंकायला लागला. टॉर्च फिरवून मागे बघितलं तर एक भलामोठा साप होता. साप आणि विंचवाचं अखंड वास्तव्य असतं आमच्या परिसरात. साप गेला निघून, पण धावत येऊन लक्ष्मणनं जीवाला घट्ट मिठी मारली. ‘‘अगदी जीवासारखा (महाराजांचा जीवा) धावून आलास’’ म्हणाले आणि तेव्हापासून त्यांची जी गट्टी जमलीय विचारतेस काय! तसा आमचा जीवा इमोशनल आहे. थोडा ऍग्रेसिव्ह पण आहे. तरी जीव लावणाराच. काही दिवसांनी जीवा एकटा एकटा चिडचिड करायला लागला. मग त्याला कंपनी म्हणून जिप्सी आली.

विक्रम होशिंग… आमचा मित्र, ऑनिमल बीहॅवियरिस्ट आहे. नवीन डॉग कसा आणावा याबद्दल त्याने खूप गाईड केलं. तेव्हा मिक्स ब्रीड जिप्सी आली. पटलं यांचं. खरं तर जिप्सी थोडी अलिप्त राहणं पसंत करते. बहुतेक फार कोणात गुंतून पडणं तिला आवडत नाही. प्युअर ब्रीड. ती काही महिन्यांची असताना अचानक गेली. मीसुद्धा नव्हते तिथे. मृत्यूचं आणि माझं डील आहे बहुतेक आणि मृत्यू हे वास्तव मी ऍक्सेप्ट केल्याने म्हणा, मला कोणी गेलं की, रडायले नाही येत. हळहळ वाटते, पण आय मूव्ह ऑन. जानूच्या वेळी मात्र गलबलायला झाले. खूप खूप वाईट वाटलं होतं. वेळकाळ बरेच दिवस माझ्यासाठी तिथेच थांबला होता. अडकले होते मी तिच्यात. मला माझ्यातली ही बाजू पहिल्यांदा कळली होती. असंच एकदा जीवा धावत आला माझ्याकडे. कपडय़ांना धरून खेचायला लागला. त्याच्या घराकडे घेऊन गेला. विचित्रच वागायला लागला. विचित्र म्हणजे घाबरलेच मी. त्याने उलटय़ा केल्या आणि अत्यंत रेस्टलेस होता. डॉक्टर आले, इंजेक्शन दिले आणि अंदाज वर्तवला की, विषारी किडा चावला किंवा खाल्लाय त्याने. दिवसभर मांडीत पडून होता माझ्या. जीव वरखाली झाला होता बाई!’’

‘‘जीव वगैरे वरखाली नाहीच होत माझा, पण ही पिलं आल्यापासून ‘तानसा’वर (आमचं फार्महाऊस) मी त्यांची चौकशी करायला नित्याने फोन करतो. ही मंडळी आयुष्याचा भाग होणार आहेत म्हटल्यावर मी त्यांच्या विषयीचं खूप वाचन केलं. फाजील लाड नाही, पण प्रेमाने करतो मी सगळं त्यांचं. कुठलाही पाळीव प्राणी, विशेषतः कुत्रे हे माणसाचा इगो सुखावतात, पॅम्पर करतात. कारण आयुष्यभरासाठी माझ्यावर कुणीतरी अवलंबून आहे अशी भावना आणि कुणीही नसलं तरी मी आहे हे आश्वासन निरपेक्ष भावनेने नाही म्हणणार, पण मनापासून, प्रामाणिकपणे तुमचे आहोत असा विश्वास मात्र ते देतात’’ अतुलदादा म्हणतात, ‘‘एरवी काही काम सोडून कोणासाठी, कुणाची सेवा करायला घरी बसल्याचं नाही आठवत, पण जीवा आणि जिप्सीला न्यूटर केलं तेव्हा मुद्दामहून काम न घेता घरीच थांबलो. डॉक्टरांकडून समजून घेऊन त्यांचे टाके पण मीच काढले. त्यांची माझ्यावरची फिजिकल, इमोशनल डिपेन्डन्सी बघून बरं वाटलं. आपलं वाटलं, पहिल्यांदाच मनापासून कुठल्याही प्राण्याच्या जवळ गेलो. मी जीवा आणि जिप्सीशी जसं बोलतो तेवढं कुणाशीही बोलताना मला पाहिलंच नाहीये असं आमची मित्रमंडळी म्हणतात. म्हणजे इतक्या प्रेमळ स्वरात’’ एक बारीकसं अतुल कुलकर्णी स्माईल देत ते म्हणाले. ‘‘जिप्सीला पिरियड्स यायचे तेव्हा मी रेस्टलेस असायचो. भीती वाटायची की, ती बाहेर जाईल किंवा बाहेरचे कुत्रे आत येऊन तिला त्रास देतील’’. कितीही ‘‘मी असा आहे गं’’ म्हटलं तरी ते काळजी असणारं, अटॅचमेंटवालं फादर इन्स्टिंक्ट मला अतुलदादांशी बोलताना जाणवत होतंच.

‘‘जाई, जुई आमच्या दोन बंडखोर मांजरी. आमच्या नॅचरल पेस्ट कंट्रोलर, आमच्या घरातल्या मस्तीची व्याख्या आणि आळशीपणाचं उदाहरण. खरं तर जीवा, जिप्सी आणि जाई, जुई यांचं फारसं सख्य नाहीये. त्यामुळे सकाळी जीवा, जिप्सीला फिरवून आणतो. मग कधी चिकन राईस, अंडं, आठवडय़ातून एकदा मटन, डॉग फूड असं छान जेवण, मग झोप, मग हुंदडणे, मग पळापळ, मग जेवण आणि रात्रभर आमच्या आवारात त्यांना मोकळं सोडत असल्याने विहार असा खरं तर दिनक्रम. झोपायच्या वेळी त्यांच्या घरात आणि तेव्हा मांजरांचं राज्य सुरू होतं. गावठी मांजरं आहेत. खरं तर ना अदिती, मी अभिनेत्री म्हणून खूप खूप काही शिकले यांच्याकडून, अधिक एक्प्रेसिव्ह झाले असं वाटतं. किती किती बोलके असतात गं त्यांचे डोळे… किती निरागसता असते डोळ्यांत… काहीच न बोलता खूप काही बोलण्याची क्षमता.. हे सगळं जमलं करायला तर वा! एक गमतीशीर किस्सा सांगते. जीवाला जेवण दिलं होतं मी आणि लक्ष्मण तिथेच होतो काहीतरी करत. जेवण झाल्यावर जीवा आला जवळ आणि चाटायला लागला मला. ‘थँक यू!’ म्हणत होता छान जेवण दिलं म्हणून. ‘अरे जीवा, तुझ्यासाठी जेवण लक्ष्मणकाका बनवतात ना! त्यांना जाऊन ‘थँक यू’ म्हण. खरं तर चाटलेले वगैरे लक्ष्मणला नाही आवडत हे जीवाला माहीत होतं. त्यामुळे लक्ष्मणसमोर जाऊन एकदा पायजम्याला चाटल्यासारखं केलं आणि समोर बसून राहिला गं. किती खरं वागणं आहे हे! कुठला मुखवटा नसणारं. मांडीत झोपलेल्या बाळाला तासन्तास नुसतं कुरवाळत राहायला इतकं छान वाटतं ना… आणि गंमत ऐक, नुसतं कुरवाळत नाही तर आता नॅचरली टिक्स झाल्यात का बघत राहते कुठल्याही जवळ आलेल्या कुत्र्याला’’ हसत हसत गीतांजली म्हणाली. ‘‘यांना आंघोळ हा तर एक मोठा कार्यक्रम असतो. आजूबाजूची सगळी छोटी पिलावळ गोळा होणारा आणि ओपन बाथरूममध्ये बाहेर रगडून रगडून सगळे यांना आंघोळ घालणार. बदललं आहे आयुष्य. त्यांच्या सोयीने नाही, पण आपसूकच त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या आनंदासाठी.
त्यांचं आपल्यासाठी असणं, आपल्यात असणं फक्त माझ्यातल्या ‘मी’ला सुखावत नाही, तो ‘मी’ पाठवून ‘आम्ही’त रूपांतरित होतो.