सेलेब्रिटी चॉइस – लख्खपणे आठवणारी, आवडणारी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियदर्शिनी इंदलकर

मी खूप वाचनवेडी अशी नाही, पण वाचायला आवडतं एवढं मात्र नक्की. म्हणजे एखादं पुस्तक घेतलं आणि ते अट्टहासाने पूर्ण केलं असं फारसं घडलं नाही. त्यामुळे नेमकं काय आवडतं किंवा अगदी आवडता लेखक कोण, असे प्रश्न आले की थोडं चाचपडायला होतं. पण या सगळय़ातही लख्खपणे आठवणारी, आवडणारी पुस्तकं म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचं ‘कोसला’ आणि विजय तेंडुलकरांची सर्वच पुस्तकं. ‘कोसला’ पहिल्यांदा वाचल्यानंतर जो अनुभव घेतला तोच अनुभव तो पुन्हा वाचतानाही यावा इतकं ते पुस्तक मनात, विचारांत भिनलं.

माझे आवडते लेखक, नाटककार विजय तेंडुलकर यांची मित्राची गोष्ट आणि आमच्यावर कोण प्रेम करणार? या कथा आणि ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक मला फार आवडतात. काळजाला भिडणारं असं त्यांचं लेखन आहे. तेंडुलकरांचे सर्व साहित्य हे समकालीन वाटावं असं आहे. त्यामुळे प्रत्येक पिढीला ते आपलंसं वाटतं. माझं निरीक्षण याहीपलीकडे जातं. तेंडुलकरांच्या साहित्यात उमटणारं स्त्र्ााrप्रतिबिंब मला जास्त खुणावतं. ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ ही त्यांची कथा कितीतरी जुनी आहे; परंतु यात त्यांनी मांडलेला स्त्र्ााrविषयक दृष्टिकोन आजही तितकाच लागू पडतो हे आवर्जून सांगावेसे वाटते. त्यांच्या साहित्यातून स्त्र्ााrच्या व्यक्तिमत्त्वाचे, भावनांचे आणि तिच्या अस्तित्वाचे अनेकांगी पैलू आपण अनुभवतो.

वाचनाच्या साधारण सुरुवातीच्या काळात कॉलेजमध्ये असताना मी चेतन भगतची बरीच पुस्तकं वाचली आहेत. कॉलेजच्या वयाला साजेशी, झेपणारी आणि भावनिक फॅण्टसीच्या जगात नेणारी ही पुस्तकं. फाइव्ह पॉइंट समवन, टू स्टेट्स, हाफ गर्लफ्रेण्ड ही तेव्हा आवडलेली पुस्तकं. पण काळानुसार, आपण निवडलेल्या क्षेत्रानुसार आपलं वाचन वेगळी वाट निवडतं. तसंच माझं कोसला, तेंडुलकर आणि पुढे सतीश आळेकरांची नाटकं वाचताना झालं. सुरुवातीला काहीसं क्लिष्ट, दुर्बोध वाटणारं आळेकरांचं लेखन आवडू लागलं. त्यांची झुलता पूल आणि इतर एकांकिका, बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर ही सगळीच आवडलेली नाटकं. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रवेशाची तयारी करत असताना साहित्यकृतींवर आधारित अनेक नाटकांचा परिचय झाला, त्यांची गोडी लागली. त्यापैकी या सगळय़ा साहित्यकृती आहेत.

पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं न वाचलेला मराठी वाचक सहसा दुर्मीळच. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’पासून सुरू होणारी यादी अथक आहे. मात्र मी त्यांनी लिहिलेली नाटकं कमी वाचली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘ती फुलराणी’. माझं आवडतं असं हे नाटक. या साहित्यकृतीवर अंशतŠ आधारित असं कथानक असणारा चित्रपट आणि त्यातली फुलराणीची भूमिका करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
(शब्दांकन: शुभांगी बागडे)