आयआरएस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आयआरएस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयआरएस अधिकारी डॉ. अमित कुमार सिंघल यांना अटक केली.

फूड फ्रेंचाइजी ला पिनोसचे मालक सनम कपूर यांनी सिंघल यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने अटकेची कारवाई केली. लाचखोर आयआरएस अधिकाऱ्याने दिल्लीतील घरावरील आयकर नोटीस निकाली काढण्याच्या बदल्यात मध्यस्थाच्या मदतीने 45 लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर सीबीआयच्या टीमने सापळा रचला होता. याचदरम्यान लाच स्वीकारताना सिंघल यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ला पिनोसच्या मालकाने दावा केला की त्यांच्या कंपनीच्या मालकांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांना नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. त्याआधारे सीबीआयने अधिक तपास सुरू ठेवला आहे.