`सीएसएमटी’ खासगी कंपनीकडे! 60 वर्षांचा करार; 1642 कोटी खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेले हेरिटेज स्थानक पुनर्विकासाच्या नावाखाली खासगी कंपनीला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1642 कोटी रुपये पुनर्विकासावर खर्च होतील, पण त्या बदल्यात कंपनीला अडीच लाख चौरस मीटर बिल्टअप एरिया मिळणार आहे. केंद्र सरकार 60 वर्षांचा करार कंपनीशी करणार आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये याबाबतची निविदापूर्व प्रक्रिया सुरू होणार असल्याचे इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. लोहिया यांनी सोमवारी दिल्लीतून घेतलेल्या वेबीनारमध्ये स्पष्ट केले.

या स्थानकांतील हेरिटेज वगळता इतर सर्व इमारतींना भायखळा आणि वाडीबंदर येथे हलविण्यात येणार आहे. हेरिटेज इमारतीमुळे येथील कोणत्याही नव्या बांधकामाच्या इमारतीची उंची 20 मीटरपेक्षा जादा असणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. पी. डीमेलो मार्गाकडील प्रवेशद्वारातूनच स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मुख्य मार्ग असणार आहे.

विमानतळांप्रमाणे शॉपिंग करायला मिळणार

पुर्निवकासानंतर हे स्थानक एखाद्या सीटी सेंट्रल रेल मॉलसारखे कार्य करेल. ज्यात दिव्यांगांसाठीही खास सुविधा असतील, प्रवाशांच्या वाहतुकीबरोबरच त्यांच्या रिटेल, एन्टरटेन्मेंट आणि शॉपिंगच्या गरजादेखील भागविल्या जातील. त्यासाठी विमानतळाप्रमाणे युजर चार्जेसही भरावे लागतील, असेही व्यवस्थापकीय संचालक लोहिया यांनी स्पष्ट केले.

मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये रूपांतर

हार्बरचा मार्ग (सीएसएमटीतील 1 आणि 2 मार्ग) पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी वापरण्याची योजना आहे. त्यामुळे हार्बर मार्ग सँडहर्स्ट रोड येथून पी. डिमेलो मार्गावर एलिवेटेड स्वरूपात दुसऱ्या मजल्यावर समाप्त करण्याची योजना आहे. हार्बरच्या प्रवाशांना जर फोर्ट भागात जायचे असेल किंवा पुन्हा उपनगरीय फलाटांकडे यायचे असेल तर त्यांना वळसा मारीत पी. डीमेलो मार्गावरील नव्या एफओबीद्वारे उपनगरीय मार्गाकडे यावे लागणार आहे. उपनगरीय रेल्वे, लांबपल्ल्यांच्या मार्ग, एलिवेटेड हार्बर मार्ग आणि मेट्रो यांना जोडणाऱ्या `मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब’मध्ये या स्थानकाचे येत्या आठ वर्षांत रूपांतर करण्यात येणार आहे.