
केंद्रीय अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राजीनामा दिला आहे. नक्वी यांचा राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ उद्या गुरुवारी संपणार आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून नक्वी यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या यादीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे नाव नव्हते. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही सहा महिन्यांसाठी केंद्रीय मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. मात्र, नक्वी यांनी आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
6 ऑगस्टला निवडणूक
उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. भाजपकडून नक्वी यांच्या उमेदवारीची शक्यता आहे.
मुख्तार अब्बास नक्वी हे 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते माहिती-प्रसारण मंत्री होते. दोनवेळा राज्यसभेवर निवडून गेले. 2014 पासून ते अल्पसंख्याक विभागाचे मंत्री होते.




























































