मध्य रेल्वेची एसी लोकल 20 सेकंदांच्या कसोटीत फेल!

351

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल स्थानकांत शिरण्याआधीच प्रवासी चढत आणि उतरत असल्याने एसी लोकलला मुख्य मार्गावर चालविताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलला 20 सेकंदांच्या थांब्याची अट घालण्यात आली असतानाही प्रत्यक्षात तिला दहा सेकंद अतिरिक्त लागून 30 सेकंदांचा थांबा द्यावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलला दरवाजे उघडबंद होऊन तसेच प्रवासी चढण्याचा आणि उतरण्याचा एकंदर वेळ 20 सेकंद गृहीत धरला होता, परंतु प्रत्यक्षात ट्रान्सहार्बर मार्गावर 30 सेकंद लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्थानकात कमी प्रवासी चढत आणि उतरत असले तरी गाडी काही मिनिटे रखडत आहे. ट्रान्सहार्बरवर वेळापत्रकात बराच ‘गॅप’ असल्याने तसेच तुलनेने फारसे ट्रफिक नसल्याने रोजची काही मिनिटे लेट होऊनही तिचा एकूण वेळापत्रकावर प्रभाव पडत नाही. प्रवाशांची एसी लोकलला नवीन फेरी म्हणून चालवा अशी मागणी होत आहे, परंतु मध्य रेल्वेवर दररोज 1774 फेऱया चालविण्यात येत असून आणखी फेऱयांची वेळापत्रकात जागाच शिल्लक नसल्याचे म्हटले जात आहे.

मिक्स लोकल कधी येणार?

पश्चिम रेल्वेवर पाच ते सहा आणि मध्य रेल्वेवर तीन एसी लोकल आल्या आहेत, परंतु त्यांना मागणी नाही. आता उन्हाळा आल्यावर तरी मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवासी मिळतील असे म्हटले जात आहे. ‘मिक्स’ एसी लोकल चालविण्याचा पर्याय सुचविला जात आहे, परंतु रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव विचाराधीन आहे.

मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या पंधरवडय़ाची कामगिरी

  • एकूण तिकीट 2,535
  • एकूण प्रवासी 13,104
  • एकूण उत्पन्न 5,71,698
आपली प्रतिक्रिया द्या