ऑडिओ अलर्ट यंत्रणेमुळे रेल्वे अपघात कमी होणार

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोटारमनच्या चुकांमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ऑडिओ अलर्ट यंत्रणा आणली आहे. लोकलच्या दोन्ही बाजूच्या मोटारमन केबिनमध्ये सदरची ऑडिओ अलर्ट यंत्रणा लावण्यात येत आहे. त्यामुळे मोटारमनला वारंवार सावध केले जाणार आहे. तसेच पिवळा सिग्नल असेल तर त्यापुढे लाल सिग्नल असेल अशी कल्पना आधीच मोटारमनला मिळणार आहे. त्यामुळे मोटारमनला आणखी सतर्क राहता येणार आहे.

मध्य रेल्वेकडून उपनगरीय मार्गावर 1800 हून अधिक लोकल सेवा चालवल्या जात असून याच मार्गावरून अनेक मेल एक्स्प्रेस, मालगाडय़ाही धावतात. त्यामुळे सर्वसाधारण रेल्वे मार्गाच्या तुलनेत सिग्नलचे प्रमाण अधिक आहे. तसेच गाडय़ांची वारंवारता मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मानवी चुकांमुळे होणारे लोकल ट्रेनचे अपघात, टक्कर आणि रुळावरून घसरण्याच्या घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून लोकल ट्रेनच्या मोटारमन केबिनमध्ये ऑडिओ अलर्ट युनिटस् बसवण्यात येत आहेत. सदरची यंत्रणा मोटारमनला अलर्ट करण्याचे काम करणार आहे.

90 लोकल गाडय़ांमध्ये लागली यंत्रणा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 151 लोकल गाडय़ा आहेत. त्यापैकी आतापर्यंत 90 गाडय़ांच्या मोटारमन केबिनमध्ये ऑडिओ अलर्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे, तर उर्वरित 71 गाडय़ांमध्ये 2024 च्या अखेरपर्यंत ही यंत्रणा लावली जाणार आहे. लोकल गाडीमध्ये लावण्यात येत असलेल्या ऑडिओ अलर्ट यंत्रणेच्या एका सेटसाठी 9 हजार रुपयांचा खर्च येत आहे. एका गाडीत दोन सेट बसवावे लागत असल्याने एकूण 18 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.