टॉवेल, रुमाल टाकून सीट अडवणाऱ्यांना बेड्या, मध्य रेल्वेने चार महिन्यांत 1 हजार 367 जणांवर केली कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेच्या डब्यात टॉवेल किंवा रुमाल टाकून सीट अडवणाऱ्या प्रवाशांच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेने आता कठोर पाऊल उचलले आहे. आरपीएफने ‘ऑपरेशन उपलब्ध’अंतर्गत अशा जागा अडवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत गेल्या चार महिन्यांत तब्बल 1 हजार 367 जणांवर कारवाई केली आहे.

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गाडीत चढण्यापूर्वी बेकायदेशीरपणे काही प्रवासी टॉवेल, बॅग किंवा रुमाल टाकून आरक्षित बर्थ आणि जागांवर अतिक्रमण करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हा त्रास सर्रास आढळतो. त्यामुळे आरक्षण असलेल्या प्रवाशांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरते. ‘ऑपरेशन उपलब्ध’अंतर्गत आरपीएफच्या पथकांनी आरक्षित डब्यांमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश आणि जागांवर अवैध कब्जा करणाऱ्यांविरुद्ध अचानक तपासणी आणि आक्रमक मोहीम राबवली. जानेवारी ते एप्रिल 2026 दरम्यान मध्य रेल्वेमध्ये 1377 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 1367 जणांना पकडण्यात आले. एकट्या मुंबई विभागात तब्बल 998 गुन्हे दाखल झाले आणि 986 जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्प अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.

केवळ सीट अडवणारेच नव्हे, तर गांजा तस्कर आणि प्रवाशांचे हरवलेले साहित्य मिळवून देण्यातदेखील आरपीएफला मोठे यश मिळाले आहे. आरपीएफने 43.67 लाख रुपयांचा अवैध माल जप्त केला आहे तसेच तीन कोटी रुपयांहून अधिक किमतीचे प्रवाशांचे हरवलेले सामान हस्तगत केले आहे.