
मध्य रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण दरवर्षी वाढतेच आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 30 लाख 75 हजार फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 183.16 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आर्थिक वर्ष 2024-25 मधील आकडेवारीच्या तुलनेत फुकटय़ांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाली.
मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासनीस पथकांमार्फत विनातिकीट, अनधिकृत प्रवाशांविरोधात कारवाई केली जात आहे. विनातिकीट प्रवाशांचा वैध प्रवाशांना त्रास होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. विशेष पथकांनी एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान 30.75 लाख विनातिकीट प्रवाशांना पकडले. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 28.01 लाख प्रवाशांना पकडण्यात आले होते. गेल्या महिन्यात 3.24 लाख फुकटय़ा प्रवाशांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 18.25 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंडवसुलीचे प्रमाणही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढले आहे. अनेक प्रवासी वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवून वैध तिकीट काढणे टाळत आहेत. बनावट तिकिटांचे प्रकार उघडकीस आल्याने तिकीट तपासणी मोहीम विशेष गांभीर्याने राबवली जात असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
मुंबई विभागात सर्वाधिक प्रमाण
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱयांचे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. मुंबई विभागात 9 महिन्यांत 12.82 लाख प्रवासी पकडले. तसेच भुसावळ विभागात 7.54 लाख, पुणे विभाग-3.41 लाख, नागपूर-3.33 लाख, सोलापूर-1.81 लाख आणि मुख्यालय क्षेत्रात 1.83 लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.




























































