
प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली लोकलमधील मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. हा मोटरमनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून प्रशासनाने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करीत मध्य रेल्वेवरील मोटरमननी 4 मेपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
लोकल ट्रेनच्या मोटरमनकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होणे, लाल सिग्नल असताना गाडी पुढे नेणे असे प्रकार काही वेळेला घडतात. अशा प्रकारांमागील कारणे शोधण्यासाठी प्रशासनाने मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय म्हणजे प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली मोटरमनना मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे. मध्य व पश्चिम मार्गावर दिवसभरात लोकलच्या 2,342 फेऱ्या धावतात. यात लाल सिग्नल असताना गाडी पुढे नेण्याचे प्रकार फार कमी वेळा घडतात. मोटरमन प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण जाणीव ठेवून लोकल चालवतात. असे असताना प्रशासनाने मोटरमनना लोकल सिग्नलजवळ पोहोचत असताना सीसीटीव्ही पॅमेऱ्यासमोर हात वर करून सिग्नलची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. या निर्णयाविरोधात मोटरमनमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या अनुषंगाने मोटरमनच्या कामगार संघटनांनी रेल्वेला सीसीटीव्ही पॅमेरे बसवण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्याची विनंती केली आहे. प्रशासनाने 3 मेपर्यंत निर्णय मागे घ्यावा, अन्यथा 4 मेपासून आंदोलन केले जाईल, असा इशारा मोटरमनच्या संघटनांनी दिला आहे.
रेल कामगार सेनेचा आंदोलनाला पाठिंबा
सीसीटीव्हीच्या नियंत्रणामुळे येणाऱ्या दबावाखाली मोटरमनला काम करावे लागू नये यासाठी मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही न बसवण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्या आंदोलनाला आमचाही पाठिंबा राहील, असे रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी जाहीर केले.