
मध्य रेल्वे मार्गावर नजिकच्या काळात 15 डबा लोकलची संख्या वाढणार आहे. याच अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने रविवारी मुलुंड-ठाणे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि ठाणे यार्डच्या पुनर्बांधणीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. यार्डमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे 15 डब्यांच्या गाडय़ांचे स्टॅबलिंग तसेच सुरळीत देखभाल शक्य होईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेतला होता. ब्लॉक अवधीत धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आणि प्लॅटफॉर्म विस्तारासह यार्ड पुनर्बांधणीचे काम करण्यात आले. या कामात अभियांत्रिकी, ओएचई, सिग्नल-टेलिकम्युनिकेशन आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. क्रेन मशीन वापरून स्विचेस व कल्व्हर्ट काढणे, सायडिंगचे काम-टॅम्पिंग, क्रॉसओव्हर घालणे आणि ट्रक शिफ्टिंग, 80 मीटर नवीन ट्रक टाकणे, ओएचई देखभाल, पॉइंट मशीन, सिग्नल आणि ट्रक सर्किट दुसरीकडे हलवणे अशी विविध कामे करण्यात आली. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यासाठी 34 यार्ड रिमॉडेलिंगचा हा एक भाग असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
ब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांची तारांबळ
मध्य रेल्वेने पाच तासांचा ब्लॉक घेतला होता. या काळात सर्वच लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. रविवारच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी लग्न समारंभ पार पडले. या समारंभांना वेळेत पोहोचण्यासाठी लगबग करणाऱया कुटुंबियांची मध्य रेल्वेच्या प्रवासात रखडपट्टी झाली. गाडय़ांना 15 ते 30 मिनिटांचा विलंब, त्यात अनेक फेऱया रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.





























































