
सेंट्रल रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी एक पायलट प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत हँडहेल्ड उपकरणांनी सुसज्ज फिरत्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना तिकीट दिले जात आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
मोबाईल UTS सहाय्यक असे नाव देण्यात आलेले हे कर्मचारी वेटिंग रुम , कॉन्कोर्स आणि रांगेत फिरून, मोबाईल फोन आणि पोर्टेबल थर्मल प्रिंटरच्या साहाय्याने तिकीट जारी करतात. हे तंत्र BEST बस कंडक्टर वापरत असलेल्या प्रणालीसारखे आहे. प्रवासी डिजिटल किंवा रोखीने पैसे देऊ शकतात.
या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या चाचणीत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असे तीन सहाय्यक नियुक्त आहेत आणि मध्य रेल्वेने त्यांची संख्या वाढवून सुमारे 15 पर्यंत नेण्याची योजना आखली जात आहे. दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीत सामान्य डब्यांसाठी तिकीट जलद देण्यासाठी ही कल्पना अनौपचारिकरीत्या चाचणी करण्यात आली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या सहाय्यकांना मोबाईल फोन आणि छोटा तिकीट प्रिंटर दिला आहे. ते स्टेशन परिसरात एका प्रवाशाकडून दुसऱ्याकडे जातात आणि भाडे मिळताच तिकीट जारी करतात. सध्या हा उपक्रम लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी वापरात आहे; पुढे तो उपनगरी गाड्यांसाठीही लागू करता येईल.
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, या तीन सहाय्यकांनी दोन आठवड्यांच्या आत 12,733 तिकीट जारी केली आणि 20.33 लाख महसूल मिळवून दिला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दररोज दहा लाख तिकीटे जारी होतात आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की गर्दीनुसार फिरत्या कर्मचाऱ्यांना तिकीट खिडक्यांच्या आतही काम करण्याची परवानगी दिली जात आहे.
मध्य रेल्वे इतर प्रमुख स्थानकांवरही मोबाईल UTS सहाय्यक सुरू करण्याची योजना आखत आहे. ही प्रणाली आधीच नवी दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि चेन्नई स्थानकांवर लागू झाली आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी माहिती दिली की, मोबाईल UTS सहाय्यक हे तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी सेंट्रल रेल्वेचे आणखी एक पाऊल आहे. ही सेवा जलद आणि वेळ वाचवणारी असल्याने आम्ही प्रवाशांना ती वापरण्याचे प्रोत्साहन देतो असेही नीला यांनी सांगितले.
ही तिकीट सेवा एक कंत्राटदार चालवतो, ज्याला तिकीटाच्या अंतरानुसार 1 ते 3 टक्के कमिशन मिळतं. प्रवास जितका लहान, तितके जास्त टक्केवारी. प्रत्येक मोबाईल डिव्हाइस आणि ब्लूटूथ थर्मल प्रिंटरच्या सेटची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे आणि ते जवळपास 150 तिकीट रोल छापू शकतात.































































