
तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाळय़ाची चाहूल लागली असून यंदा उपनगरीय लोकल प्रवाशांच्या घशाला कोरड पडणार आहे. प्रवाशांना पिण्यासाठी सहजपणे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून मध्य रेल्वेने मुंबई विभागातील 28 स्थानकांमध्ये वॉटर वेंडिंग मशीन बसवण्यासाठी टेंडर मागवले होते. मात्र त्याला पुरवठादारांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे केवळ 9 स्थानकांमध्ये 19 वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात येणार असल्याने ऐन उन्हाळय़ात प्रवाशांची पाण्यासाठी गैरसोय होणार आहे.
रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी स्वस्तात शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून मध्य रेल्वेच्या 28 स्थानकांमध्ये 41 वॉटर वेंडिंग मशीन चार वर्षांपूर्वी बसविण्यात आल्या होत्या, मात्र कोरोना महामारीच्या काळात या मशीन बंद पडल्या असून सुमार सेवेमुळे आयआरसीटीसीने सदर वॉटर वेंडिंग मशीनचे कॉण्ट्रक्ट रद्द केले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून त्यांना बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत आहे. त्याची दखल घेत रेल्वेने नुकतेच वेगवेगळय़ा 28 स्थानकांमध्ये वॉटर वेंडिंग मशीन लावण्यासाठी पुरवठादारांकडून टेंडर मागवले होते. पण केवळ नऊ स्थानकांमध्ये सदरच्या मशीन लावण्यासाठी पुरवठादारांनी टेंडर भरले आहे. चेंबूर, मानखुर्द, कळवा, मुंब्रा, कल्याण, पनवेल, रोहा या स्थानकांत 13 मशीन बसवल्या असून उर्वरित सहा लवकरच बसवण्यात येणार आहेत.
इथे वॉटर वेंडिंग मशीनला प्रतीक्षा
मस्जिद बंदर, वडाळा, किंग्ज सर्कल, रे रोड, जीटीबी नगर, डॉकयार्ड रोड, शहाड, आंबिवली, आसनगाव, कसारा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जत, खोपोली आदी स्थानकांत वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यासाठी कोणीही पुरवठादार समोर आलेला नसल्यामुळे प्रवाशांनाचा घसा कोरडाच राहणार आहे.



























































