
मागील अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच सोमवारी तब्बल 14 तास लोकल सेवा विस्कळीत राहिली. या काळात प्रवाशांचे हाल झाले असतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकलची व्यवस्था कशासाठी केली, असा संतप्त सवाल करीत मध्य रेल्वे मार्गावरील विविध प्रवासी संघटनांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या अध्यक्षा लता अरगडे यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेसोबत कल्याण कसारा प्रवासी संघटना, कर्जत रेल्वे प्रवासी संघटना, संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी लागोपाठच्या तांत्रिक बिघाडांमुळे लोकल सेवेचा दिवसभर गोंधळ उडाला. या काळात प्रवाशांचे प्रचंड हाल होऊन तीन प्रवाशांचा हकनाक बळी गेला. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा आणि संकटकाळात कर्मचाऱयांनी विशेष लोकलमधून प्रवास करीत दाखवलेल्या मुजोरीचा निषेध नोंदवला. रेल्वे व्यवस्थापकांनी संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले आणि लवकरच सर्व प्रवासी संघटनांची एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले.
बेजबाबदार कर्मचाऱ्यांची तत्काळ चौकशी करा
सोमवारच्या गंभीर परिस्थितीत ठाणे स्थानकात रेल्वे कर्मचाऱयांच्या विशेष लोकलमध्ये जागा उपलब्ध असतानाही सामान्य प्रवाशांना प्रवेश देण्यात आला नाही. आतील कर्मचाऱ्यांनी ट्रेनचे दरवाजे बंद करून ठेवले होते. त्याचे व्हिडीओ पुरावे उपलब्ध असून त्याआधारे रेल्वेने बेजबाबदार कर्मचाऱ्यांची तत्काळ चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी संघटनांनी केली.
कल्याण रिमॉडेलिंग प्रकल्प वेळेत पूर्ण करून सेवा सुधारा
रेल्वे कर्मचाऱयांच्या विशेष लोकलच्या व्यवस्थेचा पुनर्विचार करावा, पीक अवर्सला ठाणे स्थानकातून कसारा, कर्जत, बदलापूर, अंबरनाथसाठी शटल लोकल फेऱ्या वाढवण्यात याव्यात, कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करा, कल्याण रिमॉडेलिंग प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून लोकलसेवा जास्तीत जास्त कार्यक्षम करावी, कल्याण-बदलापूर व कल्याण-कसारा मार्गावरील काम जलदगतीने पूर्ण करा, अशा विविध मागण्या प्रवासी संघटनेमार्फत करण्यात आल्या आहेत.

























































