
रेल्वे स्थानकांवरील वाढत्या गर्दीबरोबरच चेन पुलिंगच्या घटनांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या सहा रेल्वे स्थानकांवर सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱ्या स्थानकातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
कोरोना काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली होती. तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱ्या स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी वर्षभरापूर्वी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपयांवरून 50 रुपये एवढे केले होते. मात्र आता चेन पुलिंगचे कारण समोर करून चक्क सायंकाळपासून रात्रीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. दरम्यान, या निर्बंधातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, गरोदर महिला मुक्त राहणार आहेत. सदरचा निर्णय 15 जुलैपर्यंत लागू राहणार असणार आहे.

























































