
रेल्वे प्रवासात एखादा अनुचित प्रकार घडल्यास मोटरमनबरोबरच गार्डचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्येक डब्यात असलेली आपत्कालीन साखळी आता मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेली ही साखळी प्रवासी किरकोळ कारणासाठी ओढत आहेत. एका गाडीची साखळी ओढल्यास मागील चार गाडय़ा लेट होतात. मुंबई विभागात दररोज दहा-बारा चैन पुलिंगच्या घटना घडतात, तर गेल्या वर्षभरात 3424 अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे तब्बल 2025 लोकल आणि मेल गाडय़ांना लेटमार्क मिळाला आहे. परिणामी दैनंदिन वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मध्य रेल्वेच्या संकल्पाची ऐशीतैशी होत आहे.
मध्य रेल्वे मार्गावर दररोज 1800हून अधिक लोकल, मेल-एक्सप्रेस आणि मालगाडय़ा धावतात. प्रत्येक चार मिनिटाला एक लोकल गाडी धावते. तसेच उपनगरीय लोकल मार्गावर प्रत्येक 600 मीटरवर सिग्नल आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार गाडय़ा चालवताना रेल्वेच्या ट्रेन मॅनेजमेंट विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच प्रवाशांकडून वारंवार आपत्कालीन साखळी ओढली जात असल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडत असून त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. वर्षभरात 3424 चैन पुलिंगच्या घटना घडल्या असून त्यात 2890 प्रकरणांत गुन्हे दाखल झाले होते.
प्रवाशांनी वेळेत रेल्वे स्थानकात यावे
मेल–एक्सप्रेस गाडय़ा पकडण्यासाठी अनेकदा प्रवासी विलंबाने येतात. त्यामुळे गाडी थांबवण्यासाठी प्रवासी आपत्कालीन साखळी ओढतात. परिणामी गाडय़ांना विलंब होतो. त्यामुळे प्रवाशांनी मेल गाडी पकडण्यासाठी वेळेत रेल्वे स्थानकात यावे, पुरेशा कारणाशिवाय आपतकालीन साखळी ओढू नये, असे आवाहन रेल्वने केले आहे.




























































