मध्य रेल्वेच्या पारदर्शक छतांच्या ‘विस्टाडोम कोच’ला तुडूंब प्रतिसाद, लागोपाठ सुट्टया आल्याने वेटींग लीस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणच्या निसर्ग सौदर्याचा आनंद लुटण्यासाठी मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला काही वर्षांपूर्वी पारदर्शक छताचे ‘विस्टाडोम कोच’ बसविण्यात आले होते. त्यानंतर अलिकडेच लोणावळा आणि खंडाळा घाटाच्या सौदर्याचा आनंद मनमुरादपणे घेण्यासाठी पुण्याला जाणार्‍या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्सप्रेसलाही अशा प्रकारचे विस्टाडोम कोच बसविण्यात आले होते. या विस्टाडोम कोचला लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील चार दिवसांची बुकींग फुल्ल झाले असून वेटींग लिस्ट लागली आहे.

मुंबई ते गोवा मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद चांगल्या पद्धतीने घेतला जावा यासाठी 2018 मध्ये प्रथम मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला पारदर्शक छताचा विस्टाडोम कोच लावण्यात आला होता. या कोचना प्रवाशांची पसंती लाभल्याने मुंबई ते पुणे मार्गावरील खंडाळा आणि लोणावळा घाटातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी डेक्कन एक्स्प्रेसला 26 जून 2021 पासून विस्टाडोम कोच लावण्यात आला. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावरच धावणार्‍या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसलाही 15 ऑगस्टपासून विस्टाडोम कोच बसविण्यात आला. या विस्टाडोम कोचला चांगला प्रतिसाद मिळत असून सुट्ट्यांच्या दिवशी तर वेटिंग लिस्ट असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी सांगितले.

1 ते 11 एप्रिल दरम्यान विस्टाडोमची स्थिती

गाडी – आसने – प्रवासी – टक्के
डेक्कन क्वीन – 440 – 379 – 86
परतीची ट्रेन – 440 – 440 – 100
डेक्कन एक्सप्रेस – 484 – 443 – 92
परतीची ट्रेन – 484 – 425 – 88
मडगाव जनशताब्दी 484 480 99
परतीची ट्रेन 484 475 98