
मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन आता सुसाट धावणार आहेत. गाडय़ांचा वेग वाढण्याबरोबरच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या तब्बल 1206 किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रकचे अद्यावतीकरण करून वेगमर्यादेची क्षमता 130 कि.मी.पर्यंत वाढवली आहे. याचा थेट फायदा सोलापूर आणि नाशिक मार्गावर धावणाऱया एक्सप्रेस ट्रेनला होणार आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांत मध्य रेल्वेचे 4 हजार 151 कि.मी.चे रेल्वे नेटवर्क आहे. आतापर्यंत मध्य रेल्वे मार्गावर 100 ते 110 किलोमीटर वेगाने एक्सप्रेस गाडय़ा चालवल्या जातात. मात्र रेल्वेने नुकतेच रेल्वे ट्रकच्या नूतनीकरणाचे काम केले असून सिग्नल यंत्रणाही सुरू केली आहे. यात मल्टीट्रकिंग (एका विभागात अनेक ट्रक टाकणे), ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामे यांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे-दौंड विभागात 75.59 किलो मीटर, इटारसी-नागपूर-वर्धा-बल्हारशाह विभागात 509 कि.मी., वर्धा-बडनेरा विभागात 95.44 कि.मी., इगतपुरी- मनमाड-भुसावळ विभागात 526.65 कि.मी. रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण केले आहे. त्यामुळे दोनशेपेक्षा जास्त मेल-एक्सप्रेस गाडय़ांचा वेग ताशी 130 कि.मी.पर्यंत वाढणार आहे.
या मार्गांवरही वेग वाढणार
दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभागात रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय 17 कि.मी.च्या पुणतांबा-शिर्डी विभागावर 75 कि.मी. प्रतितासवरून 110 कि.मी. प्रतितास आणि 9 कि.मी.च्या बडनेरा-अमरावती सेक्शनवर 65 कि.मी. ताशी वरून 90 कि.मी. प्रतितास वेग वाढवला जाणार आहे.

























































