महादेव अ‍ॅपसह 22 अ‍ॅप्स, वेबसाइट ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगढमधील प्रचारात वादंगाचा मुद्दा झालेल्या बेकायदा महादेव बेटींग अ‍ॅपसह 22 सॉफ्टवेअर आणि वेबसाइटवर इडीच्या तपासाअंती केंद्राने बंदी आणली आहे. महादेव बुक आणि रेड्डीअण्णाप्रेस्टोप्रो या अ‍ॅपसह एकूण 22 बेकायदा बेटींग अ‍ॅप आणि वेबसाइट इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याने ब्लॉक केल्या असल्याचे सरकारचे निवेदन पीआयबीने प्रसृत केले आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सांगण्यावरूनच आपण दुबईला गेलो असा दावा महादेव अ‍ॅप प्रकरणातील एका आरोपीने दुबईतून केला असतानाच ही कारवाई झाली आहे.

या प्रकरणी इडीने अटक केलेल्या असिम दास या एजंटने आपल्याला कुणा बघेल नावाच्या राजकीय व्यक्तीला निवडणूक खर्चासाठी पैसे द्यायला सांगितले होते असा जबाब दिल्याचा दावा इडीने निवेदनाद्वारे शुक्रवारी केला होता. काही दिवसांत मतदानाला सामोऱ्या जाणाऱ्या छत्तीसगढमध्ये या प्रकरणावरून आणि बघेल यांचे नाव घेतल्यामुळे राजकीय वादळ उठले आहे. भूपेश बघेल यांनी या सर्वाचा इन्कार करत, महादेव अॅपचे चालक मालक आणि केंद्र सरकारमध्ये मिलिभगत असल्याचा आरोप केला आहे.