Operation Sindoor वर संसदेत पहिल्यांदाच सरकारने दिलं उत्तर, परराष्ट्र राज्यमंत्री काय म्हणाले? वाचा…

केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत पहिल्यांदाच ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धविरामाबाबत उत्तर दिले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ति वर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले होते.”

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना  कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानने 7 मे रोजी पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानी लष्करी तळ आणि नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले.

युद्धविरामाच्या प्रश्नावर ते म्हणाले, 10 मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) हिंदुस्थानी समकक्षांशी संपर्क साधला आणि गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्याची विनंती केली. त्याच दिवशी नंतर युद्धविरामावर सहमती झाली.