
> सुहास मळेकर
‘‘चाफ्याचा वाटा कसा?’’ असे विचारल्यावर व्यवहार माहीत नसलेली ती दोन्ही बाळं बावरून पाहत राहिली.
‘‘अरे बाळ, याचे किती पैसे?’’ सहा फुलांचा तो वाटा उचलून विचारलं.
मुलांनी नुसतीच मान हलवली.
नक्कीच वीस रुपये असणार… नेहमीचं माहीत होतं!
‘‘आई कुठाय’’ विचारत मी सहा फुलांचा तो वाटा उचलला आणि बेबीच्या हातात वीस रुपये कोंबले.
रोज घरी जाताना स्टेशनच्या पादचारी पुलावर फुलं विकताना एक कुटुंब दिसतं.
त्यापैकीच दोन पिटुकली आज फुलं विकायला बसली होती. आई आज जवळपास दिसत नव्हती.
पैसे बेबीच्या हातात पडताच छोटय़ा मुलानं ते हिसकावून घेतले आणि तो धूम पळाला. बेबी रडायला लागली तशी भातुकलीच्या खेळातली ती आई पदराचं पोतेरं सावरत कुठूनशी धावत आली आणि मलाच विचारलं, ‘‘काय झालं?’’
कदाचित नेहमीचा म्हणून ती छान हसली. सविस्तर सांगितलं तेव्हा ती म्हणाली,
‘‘वडापाव आणायला गेला तो! पैसे आले की, मी वडापाव आणेन’’ तिने सांगितलं होतं त्याला. निःशब्द झालो.
मी आणखी दोन वाटे चाफा घेतला. एक वडापाव बेबीला आणि दुसरा विशीतल्या त्या आईला.
























































