
कोरोनाच्या संकटामुळे शुक्रवारी चैत्रवारीचा सोहळा रद्द करण्यात आला. मात्र, चैत्र एकादशीच्या निमित्ताने करण्यात येणारी शासकीय महापूजा मंदिर समितीच्या पुजाऱयांच्या हस्ते संपन्न झाली. चैत्र शुद्ध कामदा एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये भरणाऱया प्रमुख चार यात्रांमध्ये चैत्रवारीचा समावेश आहे. चैत्रवारीच्या सोहळ्यासाठी तीन ते चार लाख भाविकांची गर्दी असते; परंतु सोहळाच रद्द केल्याने अवघी पंढरी सुनीसुनी झाली आहे.
महापूजेप्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या ऍड. माधवी निगडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थितीत होते.
चैत्री शुद्ध कामदा एकादशीनिमित्त मंदिरात द्राक्ष व द्राक्षवेलींची आकर्षक सजावट करण्यात आली, तर चैत्र वारी रद्द करीत असल्याचे यापूर्वीच प्रशासनाने जाहीर केलेले होते. तथापि भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी संपूर्ण शहराची नाकाबंदी करण्यात आलेली असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे.




























































