
चंद्रपूर शहरात देशातील दोन भागात जाणारी दोन महत्त्वाची रेल्वे स्थानकं आहेत. यातील छत्तीसगड- मध्यप्रदेशला जोडणाऱ्या चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावरून जबलपूरसाठी थेट रेल्वे गाडी सोडण्याची गेले कित्येक वर्षांची मागणी आज अखेर पूर्ण झाली.
जबलपूरला जाण्यासाठी चांदा फोर्ट मार्गे धावणारी पहिली रेल्वेगाडी आज दुपारी स्थानकावरून रवाना करण्यात आली. ही गाडी चांदा फोर्ट ते गोंदिया -छिंदवाडा मार्गे जबलपूर येथे पोहोचणार आहे.
व्यस्त असलेल्या नागपूर स्थानकाला वगळून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या हिरव्यागार रेल्वेमार्गावरून जबलपूरसाठी रेल्वे गाडी असावी यासाठी रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदने व पाठपुरावा करण्यात आला होता.
आज ही गाडी रवाना करतेवेळी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या सदस्यांनी गाडीचे जल्लोषात स्वागत करत गाडीचे चालक सदस्य व कर्मचाऱ्यांचे पेढे भरून तोंड गोड केले. या गाडीमुळे जबलपूर व मध्यप्रदेशात जाण्यासाठी एक वेगळी सुविधा निर्माण झाली आहे. आठवड्यातून तीन दिवस ही गाडी जबलपूरसाठी धावणार असून या डेमू ट्रेनमध्ये चेअर कारसह स्लीपर कोचेस देखील आहेत.

























































