
चंदगड नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राची काणेकर, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे फिरोज मुल्ला यांची बहुमताने निवड झाली. महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे व राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
चंदगड नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्राची काणेकर या थेट जनतेतून निवडून आले होत्या, तर उपनगराध्यक्ष पद हे अद्याप रिक्त होते. त्यामुळे मंगळवार सकाळी 11 वाजता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायतीच्या दालनामध्ये झाली. चंदगड नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 10 जागांवर महाविकास आघाडीचे नगरसेवक असल्याने बहुमताने शिवसेनेचे फिरोज मुल्ला हे उपनगराध्यक्ष पदी निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विनोद रणवरे यांनी काम पाहिले..
उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे फिरोज मुल्ला यांची निवड झाल्याचे समजताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष विद्याधर गुरबे , चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर, जिल्हा महिला संघटिका संज्योती मळविकर, तालुका प्रमुख अनिल दळवी तसेच तालुका शेतकरी संघाचे तानाजी गडकरी आदि उपस्थित होते.































































