चांदोली, कोयनेत अतिवृष्टी; कृष्णेची पातळी 25 फुटांवर

chandoli-koyna-heavy-rain-krishna-river-rises-to-25-feet-flood-alert-in-sangli-and-warna-region

चांदोली आणि कोयना धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातील पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे आज सायंकाळपासून 89 हजार 100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी रात्री आठ वाजता 25 फुटांवर गेली. बुधवारी नदीची पाणीपातळी 40 फुटापर्यंत इशारा पातळीकडे जाण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. वारणा धरणातून 36 हजार 630 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा नदीवरील पूल, कृष्णवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 22.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक 59.1 मि.मी. पाऊस झाला.

जिह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरूच आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. धरण पाणलोटक्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर सुरूच राहिला. कोयना धरणात 100.39 टीएमसी जलसाठा झाला असून, धरण 95 टक्के भरले आहे. धरणातून कोयना नदीमध्ये 89 हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे मंगळवारी एका दिवसात कृष्णा नदीची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली आहे.

वारणा धरणाच्या वक्र द्वाराद्वारे दुपारी 35 हजार क्युसेक आणि विद्युतगृहातून 1630 क्युसेक असा एकूण 36 हजार 630 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडला आहे. यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून, बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. शिराळा तालुक्यातील एकूण सहा मंडळांपैकी चार मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

शाहूवाडी तालुक्याला जोडणारे आरळा ते शित्तूर, चरण ते सोंडोली, रेठरे ते कोकरूड , बिळाशी ते भेडसगाव, कांदे ते मांगले पुलासह मांगले ते सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. सांगली ते कोल्हापूर जिह्यांना जोडणारे पूल, बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे.

आज व उद्या शाळांना सुट्टी

चांदोली आणि कोयना धरणांतून मोठा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त तालुक्यांतील नागरिकांना स्थलांतर करावे लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यांसह महापालिका क्षेत्रातील शाळांना बुधवारी (20 रोजी) व गुरुवारी (21 रोजी) असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी शाळेत उपस्थित राहून आपत्तिव्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. दरम्यान, आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महापालिका आयुक्त व संबंधित यंत्रणांसह नदीकाठी जाऊन संभाव्य पूरस्थितीची पाहणी केली.